टीम इंडियाचा सलग आठवा विजय! किंग कोहलीचे शतक अन् भारताच्या गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेचे सपशेल लोटांगण
Santosh Sakpal
November 06, 2023 07:55 AM
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकाचा खुर्दा उडवलाय. टीम इंडियाने 243 धावांच्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान कायम राखलंय.
विश्वचषकात टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत सलग आठवा विजय नोंदवला. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेने सपशेल लोटांगण घातले. भारताने तब्बल २४३ धावांनी दणदणीत विजय मिळवत आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. या विजयाने टीम इंडियाचे गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले आहे. आजच्या सामन्यात बर्थडे बॉय विराट कोहलीने वन डे क्रिकेटमधील ४९वे शतक झळकावत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
विश्वचषक २०२३च्या ३७व्या सामन्यात आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर ३२७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ५० षटकांत ५ गडी गमावून ३२६ धावा केल्या. विराट कोहली १२१ चेंडूत १०१ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याचवेळी, रवींद्र जडेजा १५ चेंडूत २९ धावा करून नाबाद राहिला. त्याआधी श्रेयस अय्यरने ७७ धावा केल्या. श्रेयस आणि विराट यांच्यात १३४ धावांची शतकी भागीदारी केली.
तत्पूर्वी, टीम इंडियाची सुरुवात खूपच आक्रमक झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिलने आफ्रिकेच्या गोलंदाजांवर धावा बोलत पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक ९० धावा केल्या. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित ४० धावा करून बाद झाला. रोहित शर्माने शुबमन गिलसह ३५ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली. रोहित २४ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले.
शुबमन गिल २४ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. ९३ धावांवर दोन विकेट्स पडल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी १३४ धावांची भागीदारी केली. श्रेयस ८७ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७७ धावा करून बाद झाला. केएल राहुल काही विशेष करू शकला नाही आणि त्याला केवळ आठ धावा करता आल्या. सूर्यकुमार यादवने १४ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने जलद २२ धावा केल्या.
विराटने ४९व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. १२१ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १०१ धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याचवेळी जडेजाने २९ धावांच्या नाबाद खेळीत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. विराटचे हे ४९वे शतक होते. त्याने सचिन तेंडुलकरच्या ४९ वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दरम्यान,टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकाला विजयासाठी 327 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकाने गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकाला 27.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 83 धावाच करता आल्या. रविंद्र जडेजा आणि विराट कोहली हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. तसेच इतरांनीही चांगलं योगदान दिलं. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकाचा 243 धावांनी धुव्वा उडवला.