उद्योजिका अचला जोशी यांना ‘आत्रेय’चा शिरीष पै पुरस्कार

Santosh Gaikwad November 14, 2023 12:54 PM


मुंबई : कर्तृत्ववान उद्योजिका, समाजसेविका आणि लेखिका अचला जोशी यांची यावर्षीच्या ‘आत्रेय’ संस्थेच्या शिरीष पै पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शिरीष पै मानचिन्ह आणि रु. २१,०००/- असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.


   दरवर्षी दि. १५ नोव्हेंबर रोजी शिरीष पै जयंती आणि दै. ‘मराठा’चा वर्धापनदिन असा संयुक्त कार्यक्रम ‘आत्रेय’ ही संस्था साजरा करीत असते. या कार्यक्रमात सदर पुरस्कार दिला जातो.


   श्रीमती अचला जोशी यांना यापूर्वी उत्तम महिला उद्योजक या नात्याने राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे. स्पेनचा Arch of Europe तसेच जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, मुंबई मराठी साहित्य संघ, रोटरी क्लब, मुंबई, दादर नागरिक मंडळ आणि इतर संस्थातर्पेâही उद्योजिका, लेखिका आणि समाजसेविका या नात्याने त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्या सध्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या ज्येष्ठ विश्वस्त, मुंबई मराठी साहित्य संघ तसेच इतर नामवंत संस्थांशीही संलग्न आहेत. श्रद्धानंद महिला आश्रमाच्या माजी अध्यक्ष या नात्याने त्यांनी केलेले मोलाचे कार्य सुपरिचित आहे. ‘प्रिन्सेस वाईन’मुळे एक यशस्वी उद्योजिका आणि ‘वाईन वुमन ऑफ इंडिया’ म्हणून त्या ख्यातनाम आहेत. स्त्रियांसाठी त्यांनी उद्योग क्षेत्रात अनेक प्रकल्प प्रस्थापित केले आहेत.


  यावर्षी शिरीष पै जयंती पुरस्कार वितरण आणि दै. मराठा वर्धापन दिन असा संयुक्त समारंभ गुरुवार, दि. १६ नोव्हेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वाजता यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे आत्रेयतर्फे साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे भूषविणार आहेत. याप्रसंगी अचला जोशी यांना शिरीष पै मानचिन्ह आणि पुरस्कार एजिलस रक्तपेढीचे सर्वेसर्वा डॉ. अविनाश फडके यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.


   या समारंभानंतर उपस्थित रसिक प्रेक्षकांसाठी आचार्य अत्रे १२५ वी जयंती वर्षानिमित्त अशोक हांडे प्रस्तुत ‘अत्रे अत्रे सर्वत्रे‘ हा आचार्य अत्रे यांचा जीवनपट मांडणारा संगीतमय कार्यक्रम सादर केला जाणार आहे.


   संपूर्ण समारंभ व कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा सभागृहावर मंगळवार, दि. १४ नोव्हेंबर, २०२३ पासून रसिक प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहेत.