बोरघाट अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून प्रत्यक्ष पाहणी आणि जखमीची रुग्णालयात जाऊन विचारपूस
Santosh Gaikwad
April 15, 2023 05:02 PM
पनवेल : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघाताच्या घटनास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची चौकशी केली.
आज पहाटे पावणे चारच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात ४० ते ४५ प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यातील 13 जणांचा या अपघातात मृत्यु झाला. पहाटे हे प्रवासी पुण्याहून मुंबईकडे येत असताना अचानक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्यामुळे ही बस खोल दरीत कोसळली.
सकाळी ही दुर्घटना घडल्याचे कळल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाला फोन करून या घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी मदतकार्य करणारे हायकर्स आणि आयआरबी रेस्क्यू टीममधील सदस्यांशीही फोनवरून संवाद साधून त्यांच्याकडून या दुर्घटनेची माहिती घेतली. यानंतर त्यांनी तातडीने या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत आणि जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येतील असे जाहीर केले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अपघाताच्या घटनास्थळी भेट देऊन अपघात नक्की कसा झाला कोणाच्या चुकीमुळे झाला याची माहिती घेतली. तसेच मदत कार्यात आलेली आव्हाने समजून घेतली. त्यानंतर रुग्णालयात जाऊन जखमींवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे तसेच इतर सर्व अधिकारी देखील उपस्थित होते.