देशातील जनतेला 'भरोसा' देणारा अंतरीम अर्थसंकल्प - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Santosh Gaikwad
February 01, 2024 06:42 PM
दूध उत्पादकांच्या योजनेचे सुतोवाच महाराष्ट्रासाठी स्वागतार्ह !
मुंबई, दि. १ : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अंतरीम अर्थसंकल्प देशातील जनतेला ‘भरोसा’ देणारा असून, शेतकरी, महिला, गरीब आणि तरुणांच्या भवितव्याचा विचार करणारा आहे. मागील दहा वर्षे मोदी सरकारने राबविलेला देशातील गरीब कल्याणाचा कार्यक्रम एक पाऊल पुढे घेवून जाण्यासाठी हा अर्थसंकल्प निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
संसदेत मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम आणि यशस्वी नेतृत्वात भारत देशाचा हा १० वा परिपूर्ण असा अर्थसंकल्प सरकारने सादर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेला देशाच्या विकासाचा अमृतकाळ हा कर्तव्यकाळ होण्यासाठी अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या योजनांमध्ये देशातील सर्वसामान्य माणसाचे हित प्राधान्याने जोपासले गेले आहे. रुपये ७ लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन, नोकरदार आणि सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा दिल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पामुळे राज्यांच्या पायाभूत विकासासाठी तरतूद आणि पर्यटनस्थळांच्या विकासाला दिलेले प्राधान्य महत्वपूर्ण ठरणार आहे. मागील १० वर्षात केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध योजनांतून ११ कोटी शेतकऱ्यांना मदत झाली आहे. या योजनापुढे घेवून जाताना नॅनो युरीया बरोबरच आता नॅनो डिपीएचा प्रयोग, तेल बियांच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भर बनविण्याचा झालेला संकल्प देशाच्या कृषी क्षेत्राच्या दृष्टीने लाभदायक ठरेल. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी योजना सुरु करण्याबाबत अर्थमंत्र्यांनी केलेले सुतोवाच स्वागतार्ह आहे. देशातील दूध व्यवसायाच्या उन्नतीकरीता टाकलेले हे पाऊल महत्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वासही मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
महिला बचत गटांना प्रोत्साहन देतानाच तंत्रकुशल युवकांना व्याजमुक्त कर्जासाठी १ लाख कोटी रुपयांची केलेली तरतुद, पंतप्रधान आवास योजने बरोबरच आता सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी घरकुलांना सौर उर्जेच्या माध्यमातून ३००युनिट पर्यत मोफत वीज, आयुष्यमान भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करताना आशा सेविकांंना या योजनेचा लाभ देण्याची घोषणाही महत्वपूर्ण आहे. युवकांसाठी उद्योग फंड उभारुन उद्योगाला संधी देण्यासाठी निर्मला सितारामन यांनी केलेली घोषणा नव उद्योजकांसाठी पाठबळ देणारी आणि भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
----------