मनोज जरांगे च्या आंदोलनाची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी ! राहुल नार्वेकर यांचे निर्देश
Santosh Gaikwad
February 27, 2024 02:53 PM
मुंबई, दि. २७ :- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापले आहे. रविवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अपशब्दांचा वापर केला. त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले . त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे निर्देश राज्यशासनाला दिले. संसदीय लोकशाहीला जपणे ही सभागृहाची जबाबदारी आहे. हिंसक वक्तव्यांचे समर्थन कुणीही करीत नाही. यामुळे चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी याबाबत सखोल चौकशी करावी, असे अध्यक्ष ॲड.नार्वेकर यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. त्याचवेळी त्यांनी फडणवीसांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. त्यावरून भाजपमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याच मुद्द्यावरून आज आमदार आशिष शेलार विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला.शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा उधळून लावू म्हणतात. ही भाषा वापरणारे तुम्ही आहात कोण ? हा माझा सवाल आहे. मराठा समाजाची मोनोपॉली एका व्यक्तीला दिली का? जरांगे कुठे राहतात? तो कारखाना कोणाचा? ते दगड कुठून आले? हे समोर यावे. अंतरवाली सराटी दगडफेकप्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा समाजाने यापूर्वी काढलेले मोर्चे शांततेने झाले, तथापि यावेळी तसे घडले नाही. कोणी वैयक्तिक टीका करणार असेल तर सभागृहाने भूमिका घेतली पाहिजे. केवळ जरांगे यांची भूमिका नाही तर त्यांचा बोलविता धनी शोधणे महत्त्वाचे असल्याचे सांगून सर्व चौकशी करून सत्य बाहेर काढले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मंगळवारी विधानसभेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला. मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
------