मुंबई, दि. ३ः सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे आयटी हब तर पुसेगाव रस्त्यालगत औद्योगिक वसाहत मंजूर करण्यात आल्याची माहिती, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली. आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषद सभागृहात सातारा जिल्ह्यातील उद्योग आणि रोजगार निर्मिती संदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला.
साताऱ्याचा विकास करण्यासाठी बंद पडलेल्या महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीची जागा ताब्यात घेऊन तेथे नवीन प्रकल्प आणावा, अशी मागणी शिंदे यांनी केली. नेर गावातील जमिनी वरील शिक्के उठवले गेले नाहीत, अशी बाब निर्दशनास आणून देताना, औद्योगिक वसाहतीचा मुद्दा उपस्थित केला. पुसेगाव, निढळ परिसरात २०१४ पासून औद्योगिक वसाहत मंजूर असून, पाणीसुद्धा आरक्षित झाले आहे. सर्वेक्षण होऊन दहा हजार एकर भूसंपादन झाले आहे. परंतु अजून पुढील कार्यवाही नाही. २०१४ पासून औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. खटाव तालुक्यातील दुष्काळी भागात देखील औद्योगिक वसाहत निर्माण झाली, तर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो, अशी मागणी शिंदे यांनी केली.
महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीच्या संदर्भात कायदेशीर बाबी तपासून जागा ताब्यात घेण्यासाठी एमआयडीसी प्रयत्न करेल. नेर गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के उठवण्यासाठी आदेश दिले आहेत. लवकरच त्याबाबतही कार्यवाही पूर्ण होईल. तसेच पुसेगाव रस्त्यालगत औद्योगिक वसाहत मंजूर केली आहे. जिल्ह्यात एमआयडीसी विकसित करण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय शिरवळ येथे आयटी हब उभारणीसाठी निर्णय घेतला असून याकरिता आरक्षण ठेवण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.