*शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही - जयंत पाटील*
Santosh Gaikwad
May 11, 2023 03:30 PM
मुंबई - शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले.
राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत हे सुप्रीम कोर्टाने सांगितले. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला असल्याने विधानसभेतील शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घेताना सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्यांची नोंद केली त्या चौकटीत राहून काम करावे लागेल. यामध्ये विधानसभाध्यक्ष वेळकाढूपणाचे धोरण करू शकणार नाही. असेही जयंत पाटील म्हणाले.
शिंदेसरकार वाचले हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांचा क्षणिक आनंद राहू शकतो. कसे - बसे शिंदेसरकार वाचले ही आनंदाची भावना त्यांची राहू शकते. पण हे सर्व अवैध, घटनाबाह्य आहे. यातून भाजपने महाराष्ट्रात केलेली कृती कशी चुकीची आहे. तसेच घटनेची पायमल्ली कशाप्रकारे झाली हे राज्यातील जनतेला सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
राज्यातील सर्व राजकीय परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेत बसण्याची संधी मिळाली असती असे कोर्टाने सांगितले. यातून सुप्रीम कोर्टाच्या मनात काय होते हे स्पष्ट होते असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.