जे.पी. नड्डा हे १७ व १८ मे रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर*
Santosh Gaikwad
May 16, 2023 08:23 PM
मुंबई: भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे १७ व १८ मे रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. १८ मे रोजी पुणे येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थींशी संवाद, बुद्धीमंतांशी संवाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आ.आशीष शेलार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
बावनकुळे यांनी सांगितले की, भाजपा प्रदेश कार्यकारिणीची एक दिवसीय बैठक पुणे येथे गुरुवार १८ मे रोजी होत आहे. प्रदेश कार्यकारिणीचे सुमारे दीड हजार सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचा समारोप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या भाषणाने होणार आहे. या बैठकीनंतर नड्डा हे राज्यातल्या खासदार, आमदारांच्या बैठकीत मार्गदर्शन करतील. त्यानंतर ते राज्यातील केंद्रीय मंत्री व राज्यातले मंत्री यांच्याशी संवाद साधणार आहेत.
शेलार यांनी सांगितले की, नड्डा यांचे बुधवारी १७ मे रोजी सकाळी ११ वाजता आगमन होणार असून सायन - पनवेल मार्गावर देवनार येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला अभिवादन करून त्यांच्या मुंबईतील कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. घाटकोपर - मानखुर्द लिंक रोडवर आरबीके हॉल येथे लाभार्थी संवाद, बोरिवली येथील अटल स्मृती उद्यानात बुद्धीमंत संवाद, चारकोप येथे पन्ना प्रमुख बैठकीत सहभाग, मुंबईतील पक्षाच्या मोर्चा, आघाडी प्रमुखांशी संवाद असे विविध कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत होणार आहेत. या दरम्यान नड्डा हे रमाबाई आंबेडकर नगरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादनही करणार आहेत. १८ मे रोजी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद, युवक संवाद या कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. या दरम्यान ते सिद्धिविनायकाचे दर्शन घेणार आहेत. तसेच दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनालाही भेट देणार आहेत.