कालिंदीताईंचे निधन

Santosh Sakpal April 09, 2025 11:26 PM

MUMBAI :  विनोबांच्या अंतेवासी कालिंदीताई यांचे  काल मध्यरात्री ( ७ एप्रिल), विनोबांच्या पवनार (वर्धा) आश्रमात , वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले.

     उच्चविद्याविभूषित कालिंदीताई महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर, विनोबांकडे आल्या. त्यावेळी त्यांचे वडील 'साहित्यसमालोचन'कार    तात्यासाहेब सरवटे ( घटनासमितीचे सदस्य) विनोबांना म्हणाले, "आता तुम्हीच कालिंदीची आई व्हा!" व विनोबांनी त्यांना कन्येप्रमाणे सांभाळले.

     कालिंदीताई विनोबाच्या भूदान पदयात्रेत सहभागी झाल्या. १९६२ साली त्या विनोबाबरोबर पूर्व पाकिस्तान (आजचा बांगलादेश) भूदान पदयात्रेतही सहभागी होत्या. कालिंदीताईंच्या दैनंदिनीच्या आधारे लिहिले गेलेले 'विनोबांची पूर्व पाकिस्तान भूदान-पदयात्रा' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. 

     २५ मार्च १९५९ ला विनोबांनी पवनार (वर्धा) येथे ' ब्रह्मविद्यामंदिर'ची स्थापना केल्यावर त्या शेवटपर्यंत पवनार आश्रमातच राहिल्या.    

    आश्रमातून प्रकाशित होणाऱ्या 'मैत्री' मासिकांच्या त्या दीर्घकाळ संपादिका होत्या. विनोबांच्या अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन केले. 'प्रेमपंथ अहिंसेचा' हे विनोबांचे संकलित व संपादित आत्मचरित्र व  विनोबांच्या पत्रव्यवहाराचे 'स्नेह-सन्निधि' ही कालिंदीताईंनी संपादित  केलेली दोन महत्त्वाची पुस्तके.

     जानेवारी १९८६-८७ साली एक वर्ष कालिंदीताई , विनोबा जन्मस्थान, गागोदे येथे चार तरूण भगिनींना घेऊन आश्रमपध्दतीने राहिल्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने विनोबा जन्मस्थानाच्या कार्याला  दिशा व गती मिळाली. 

    विनोबा जन्मस्थानतर्फे त्यांचे  'ज्ञानेश्वरी: ओव्याच्या सहवासात' हे पुस्तक गेल्या वर्षी २५ मार्च २४ रोजी प्रकाशित झाले आहे. 

      कालिंदीताई दोनदा विनोबांची तपोभूमी वाई (सातारा) येथे येऊन गेल्या व त्यांनी विनोबांच्या कोटेश्वर मंदिराला भेट दिली. वाई येथे त्यांच्या हस्ते 'विनोबांची तपोभूमी: कोटेश्वर मंदिर' व विनोबांचे गुरु 'स्वामी केवलानंद सरस्वती' या चरित्राचे प्रकाशन करण्यात आले.

      विनोबांची जन्मभूमी गागोदे व विनोबांची तपोभूमी वाई, येथील दोन्ही संस्थेशी कालिंदीताईंचे अखेरपर्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले!