को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई कॅरम स्पर्धेत कल्याणजी, सोहेल, गणेश, वासिमची विजयी सलामी
Santosh Sakpal
February 03, 2024 11:44 PM
MUMBAI/SHIVNER
को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबईच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त सुरु झालेल्या आंतर सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या एकेरी कॅरम स्पर्धेत म्युनिसिपल बँकेचा कल्याणजी परमार, कोकण बँकेचा सोहेल मुकादम, एनकेजीएसबी बँकेचा गणेश शानभाग, कोकण बँकेचा वासिम खान, चेंबूर बँकेचा सुशांत सावंत, जनकल्याण बँकेचा दीपक गायकवाड, अपना बँकेचा रोहित शिर्के, सिटी बँकेचा संजय मकरे यांनी सलामीचे सामने जिंकले. पहिल्या सेटमध्ये कल्याणजी परमारने चुरशीची आघाडी घेत शैलेश कर्पेला अखेर ९-६, १४-१ असे सहज नमविले. स्पर्धेचे शानदार उद्घाटन को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, आंतरराष्ट्रीय कॅरमपटू प्रशांत मोरे व माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दादर येथील युनियन सभागृहामध्ये संपन्न झाले. नामवंत ११० स्पर्धकांची ही कॅरम स्पर्धा महाराष्ट्र मंत्रालय बँकेने पुरस्कृत केली आहे.
कोकण बँकेचा सोहेल मुकादम विरुध्द अपना बँकेचा प्रणय पवार यामधील पहिल्या फेरीची लढत अटीतटीमध्ये रंगली. पहिल्या दोन सेटच्या निर्णायक बोर्डमध्ये दोघांना जिंकण्याची समान संधी होती. अखेर सोहेल मुकादमने १५-१४, ७-३ असा सरळ चुरशीचा विजय मिळविला. अन्य सामन्यात गणेश शानभागने नितीन तेंडूलकरचा २०-०, २४-० असा; प्रथमेश पवारने मोबीन शेखचा १५-४, १९-६ असा; वासिम खानने अनिल विकाळेचा १५-१, १६-० असा; सुशांत सावंतने इस्माईल सिद्दिकीचा १७-०, १३-० असा; ऋषिकेश परबने विजय जाधवचा १४-०, १८-० असा; दीपक गायकवाडने मंगेश तांबेचा २०-०, १२-५ असा; रोहित शिर्केने निलेश खानविलकरचा १०-६, १३-५ असा आणि संजय मकरेने सचिन काटकरचा २२-०, १६-४ असा पराभव करून पहिली फेरी जिंकली. याप्रसंगी युनियनचे कार्याध्यक्ष सुनिल साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, ठाणे युनियनचे सरचिटणीस प्रदिप पाटील, सहखजिनदार जनार्दन मोरे, अन्य पदाधिकारी भार्गव धारगळकर, अमूल प्रभू, प्रकाश वाघमारे, समीर तुळसकर, अशोक नवले, प्रविण शिंदे, अमरेष ठाकूर, धर्मराज मुंढे आदी मंडळी उपस्थित होती.
************************