karnatak Result : मोदींचा करिष्मा संपला, राहुल गांधीचा प्रभाव वाढला : पृथ्वीराज चव्हाण

Santosh Gaikwad May 13, 2023 02:15 PM

मुंबई : कर्नाटकात काँग्रेसची  विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू असल्याने काँग्रेस नेत्यांकडून आनंद व्यक्त होत आहे. काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मोदींचा करिष्मा कमी झाला आहे. तर भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधींचा सकारात्मक प्रभाव पडला आहे. कर्नाटकात काँग्रसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे असे चव्हाण म्हणाले.


कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून काँग्रेस बहुमताच्या ११३ च्या आकड्यापेक्षा १६ जागा जास्त जागांवर आघाडीवर आहे तर भाजप ६७ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येणार हे निश्चित समजलं जात आहे. निवडणुकांच्या निकालावर विविध काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गेल्या ४ वर्षात भाजपचे राज्य होते. त्यावर लोक नाराज होते. सत्ताबदलाबाबत आम्हाला कोणतीही शंका नव्हती. याबाबत अंदाज होता. भाजपचा दक्षिणेचा रस्ता बंद झाला आहे. येणाऱ्या ३ राज्यातील निवडणुकांवर याचा परिणाम होईल. भाजपच्या हातून दक्षिणेकडील राज्य गेले, उत्तरेकडील किती मिळतात याबाबत शंका आहे. राहुल गांधींनी भारत जोडोत कर्नाटकच्या ७ जिल्ह्यात त्यांनी प्रवास केला. सकारात्मक प्रभाव पडला. बेळगाव वादाबाबत काँग्रेस-महाराष्ट्राची भूमिका वेगळी नाही, सुप्रीम कोर्टात वाद प्रलंबित आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.


भाजपने लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केला : नाना पटोले 

यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केला. पाच वर्षात भाजप सरकारचे कामकाज पाहिल्यास कर्नाटक जनतेवर अत्याचार केले. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असे अनेक प्रश्न कर्नाटकमध्ये या पाच वर्षात निर्माण झाल्याचा घणाघात  पटोले यांनी केला आहे. कर्नाटकमध्ये जनतेला काम करण्यासाठी ४० टक्के कमिशन द्यावे लागायचे. भाजप सरकारचा खरा भ्रष्टाचारी चेहरा समोर आला आहे. भाजपच्या कामकाजावर जनता नाराज होती. आणि याचाच परिणाम निकालात दिसून येत आहे असे पटोले म्हणाले.