डोंबिवली : फेरीवाल्यांकडून रुग्णवाहिका चालकास बेदम मारहाण केल्याप्रकरणी अनिल गुप्ता आणि रोहित गुप्ता या दोघा फेरिवाल्यांना रामनगर पोलिसानी अटक केल्यानंतर आता फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी केडीएमसी अधिकारी ॲक्शन मोडवर येत डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत रस्ते, पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर शुक्रवारी सकाळी पालिकेच्या डोंबिवली विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली.
फडके रस्ता परिसरातील चिमणी गल्ली, बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक, डॉ. रॉथ रस्ता, नेहरू रस्ता, पाटकर रस्ता, उर्सेकर, मधुबन सिनेमा गल्ली, रामनगर परिसरातील फेरीवाले पथकाने हटविले. फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे, राजेंद्र साळुंखे, पद्माकर शिवलकर आणि ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भरत पाटील, मुरारी जोशी, अरुण जगताप, मिलिंद गायकवाड आदींनी फूटपाथ अडवून बसलेल्या शेकडो फेरीवाल्यांवर आक्रमकपणे कारवाई सुरू केली .तसेच उन्हामध्ये बसून दिवसभर व्यवसाय करता यावा म्हणून फेरीवाल्यांनी निवारे उभे केले होते. या निवाऱ्यांचा त्रास पादचाऱ्यांना होत होता. याविषयी पालिकेत तक्रारी वाढल्याने हे निवारे शुक्रवारी दुपारी पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकांनी जमीनदोस्त केले. तसेच फेरीवाल्यांची दिवसेंदिवस वाढत चाललेली दादागिरी मोडीत कढण्यासाठी यापुढे ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.