*लाडकी बहीण योजना, राणा, शिंदेंचे वादग्रस्त वक्तव्य आणि मुख्यमंत्र्यांची तंबी*

Santosh Gaikwad August 14, 2024 12:53 AM


मुंबई : लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका सुरु असतंच दुसरीकडे सरकारमधील आमदार रवी राणा आणि  आमदार  महेश शिंदे  यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. या वक्तव्याचे पडसाद आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. अशी वादग्रस्त वक्तव्य करू नका, अशी तंबी मुख्यमंत्र्यांंनी दिली.  


 एकीकडे विधानसभा जिंकण्यासाठी  महायुतीकडून  लाडकी बहीण योजनेचा  जोरदार प्रचार सुरु असतानाच, दुसरीकडे आमदार  रवी राणा यांनी  आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजे 3 हजार रुपये करू. आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार, असं रवी राणा म्हणाले होते.  तर लाडकी बहीण योजनेतून नाव काढून टाकण्याचं वक्तव्य कोरेगावचे आमदार महेश शिंदेंनी केलं होतं.

लाडक्या बहीण योजनेसाठी एकीकडे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वत: मैदानात उतरलेत. तर दुसरीकडे आपल्याच पक्षांचे नेते असा वाचाळपणा करत असल्यानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाराज झाले आहेत.  मुख्यमंत्र्यांनीही सांभाळून बोला अशा कानपिचक्या दिल्या. तसेच यापुढे प्रत्येक मंत्री, लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करूनच लोकांशी बोलावं. वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारच्या योजनांवर परिणाम होतो या वादग्रस्त वक्तव्यांचा  विरोधकांनाच फायदा  होतोय असे तंबी मुख्यमंत्र्यांनी दिली.