'मित्रा' साठी मुख्यमंत्र्यांची कोटयावधीची उधळपट्टी : विरोधी पक्षनेत्याचा आरोप

Santosh Gaikwad September 18, 2023 05:51 PM


मुंबई :   महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन  ( मित्रा) नवीन कार्यालयावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.  मुंबईतील नरिमन पॉईंट भागात 'मित्रा'  चे नवे कार्यालय स्थलांतरीत केले जात असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उडवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मित्राच्या नवीन कार्यालयासाठी राज्य सरकार महिन्याला तब्बल २१ लाख रुपये म्हणजे वर्षाला २ कोटी ५६ लाख रुपय भाडे देणार असून ही सरकारी पैशांची उधळपट्टी आहे अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली आहे.

'मित्रा'चे नवे कार्यालय मुंबईतील  सर्वात महागड्या नरिमन पॉइंट भागात असलेल्या निर्मल भवनात स्थलांतरित करण्यात आले आहे. मित्राच्या नवीन कार्यालयाचे एकूण क्षेत्रफळ ७९२० चौरस फूट आहे. या नवीन कार्यालयासाठी राज्य सरकारने दरमहा २१,३८,४०० रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी या कार्यालयाच्या भाड्यात ५ % ने वाढ केली जाणार आहे. यावरुन आता विरोधकांनी टीका केली आहे. मंत्रालयासमोर असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत जागा कमी पडत असल्याचे कारण पुढे करत सरकारने हा निर्णय घेतला. अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.

 
राज्याच्या विकासासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन  करण्यात आलेल्या ‘मित्र‘ संस्थेचे  कार्यालय नरिमन पॉइंट येथील निर्मल भवन या इमारतीमध्ये  स्थानांतरित केले आहे. मंत्रालयासमोर असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत जागा कमी पडत असल्याचे कारण पुढे करत सरकारने हा निर्णय घेतला. मित्र संस्थेवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मित्राची वर्णी लावली असून आता या मित्राला बसण्यासाठी कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून देऊन ऐसपैस कार्यालयही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी तिजोरीतून पैसे ओरबडण्यासाठी महायुती सरकारची ही एक आणखी नवीन स्कीम आहे. खासगी क्षेत्र आणि अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद आणि सर्वसमावेश विकास करणे हा 'मित्र'च्या स्थापनेमागील उद्देश होता. मात्र खाजगी क्षेत्रात असलेल्या आपल्या मित्र परिवारातील लोकांवर सरकारी तिजोरीतून उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र आहे. अशी टीका वड्डेटीवार यांनी केली आहे.