विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे ९ उमेदवार विजयी, नार्वेकर रांनी विजयश्री खेचून आणली, तर जयंत पाटील पराभूत !
Santosh Gaikwad
July 12, 2024 11:00 PM
मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले तर महायुतीचे दोन उमेदवार विजयी झाले. शेवटच्या जागेसाठी उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गटाचा पाठिंबा असलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांच्यात दुसऱ्या फेरीत चुरस होती. पण अखेर मिलिंद नार्वेकरांनी जयंत पाटलांना पराभूत करत विजय मिळवला.
विधानभवनात सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर मतमोजणी झाली. लोकसभेच्या निकालानंतर आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही निवडणूक होत असल्यानेही ही निवडणूक महत्त्वाची ठरली होती. सर्वच पक्षांना क्रॉस व्होटींग भिती असल्याने गेल्या दोन दिवसांपासून खबरदारी म्हणून सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटातील आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले हेाते.
विधान परिषदेच्या या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळं नेमका कुणाचा पराभव होणार अशीच चर्चा विधानभवनात रंगली होती. शरद पवारांचा पाठिंबा असलेल्या शेकाप जयंत पाटील यांनाच हा पराभवाचा फटका बसला आहे. भाजपचे पाच उमेदवार विजय झाले. यात भाजपने पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं. तसेच एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी आणि कृपाल तुमाने दोन्ही शिवसेनेच्या नाराज माजी खासदारांना विधानपरिषदेत संधी दिली आणि निवडून आणलं. उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या टप्प्यात मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देऊनही आणि आमदारांचं संख्याबळ नसताना विजय खेचून आणला.
काँग्रेसची पाच मते फुटली?
काँग्रेसचे एकूण ३७ आमदार आहेत. त्यापैकी २५ आमदारांनी पहिल्या पसंतीची मतं प्रज्ञा सातव यांना दिली. म्हणजे काँग्रेसची पहिल्या पसंतीची १२ मतं शिल्लक राहिली. मिलींद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची २२ मतं मिळाली. उध्दव ठाकरे गटाकडे १५ मते होती त्यामुळे उर्वरित सात मतं काँग्रेसची मिळाली असली तरीसुध्दा आणखी पाच मतं फुटल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
शेकापचे जयंत पाटील यांना पहिल्या पसंतीची 12 मतं मिळाली. ही 12 मते शरद पवार गटाची आहेत.
भाजप -
पंकजा मुंडे - २६ (विजयी)
परिणय फुके - २६ (विजयी)
अमित गोरखे - २६ (विजयी)
योगेश टिळेकर - २६ (विजयी)
सदाभाऊ खोत - १४ (दुसऱ्या फेरीत विजयी)
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) -
शिवाजीराव गर्जे - २४ (विजयी)
राजेश विटेकर - २३ (विजयी)
शिवसेना (एकनाथ शिंदे गट)
कृपाल तुमाने - २४ (विजयी)
भावना गवळी -२४ (विजयी)
काँग्रेस -
प्रज्ञा सातव - २५ (विजयी)
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) -
मिलिंद नार्वेकर - २२ (दुसऱ्या फेरीत विजयी)
शेकाप (शरद पवार गटाचं समर्थन) -
जयंत पाटील - १२ (पराभूत)