विधानपरिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला निवडणूक
Santosh Gaikwad
May 24, 2024 04:46 PM
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता विधान परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विधान परिषदेच्या 4 जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची नव्याने घोषणा करण्यात आली असून दोन शिक्षक आणि दोन पदवीधर जागांसाठी पुढील महिन्यात २६ जून रोजी मतदान होणार आहे. मुंबई , कोकण पदवीधर मतदार संघ , नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे.
विधान परिषदेच्या 4 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत २ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या या चारही जागांसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून नवीन कार्यक्रमानुसार पुढील महिन्यात २६ जून रोजी मतदान होणार आहे आणि १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
विधान परिषदेच्या ४ जागांसाठी ३१ मे ते ७ जून पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. यानंतर १० जून रोजी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी होईल आणि १२ जूनपर्यंत उमेदवारांना त्यांचा अर्ज मागे घेता येईल. यानंतर २६ जून रोजी मतदान होणार असून १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी याआधी १० जून रोजी तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने 10 जून रोजी राज्यातील बहुतांश सर्वच शाळा आणि शिक्षकांना सुट्टी आहे. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम पडू शकतो, असा दावा करत ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून होत होती. निवडणूक आयोगाने शिक्षक संघटनांची ही मागणी मान्य करत विधान परिषदेच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या होत्या. पण आता निवडणूक आयोगाने नव्याने विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
*****