जपान आणि महाराष्ट्राची मैत्री अबाधित राहण्यासाठी एकत्र काम करू या : डॉ. नीलम गोऱ्हे

Santosh Gaikwad April 19, 2023 08:09 PM

जपान, ता. १९ : ‘आपत्ती व्यवस्थापन हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे या विषयावर अनेक देश काम करीत आहेत. आपत्ती व्यवस्थापन आणि त्यासाठीचे अनुभव नागासाकी आणि हिरोशिमाच्या रूपाने जपानकडे आहेतच. मात्र अनेकदा भूकंपासरख्या नैसर्गिक आपत्तीला देखील सामोरे जावे लागते. त्यासाठी पूर्वतयारी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतामध्येही गेल्या काही वर्षात भूकंप, वादळे, चक्रीवादळ अशा प्रकारच्या आपत्तीना सामोरे जावे लागले आहे. याकरिता आपत्ती व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे ही अतिशय आवश्यक आहे. महाराष्ट्राने याबाबत काम करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. येत्या काळातही जपान आणि महाराष्ट्राची मैत्री अबाधित राहण्यासाठी एकत्र काम करू या’ असे आवाहन आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.


महाराष्ट्र विधान मंडळाच्या शिष्टमंडळासह त्या जपान दौऱ्यावर आहेत. वाकायमा गव्हर्नर किशीहो शुहेई पर्फेक्चेअुल असेंब्ली अध्यक्ष ओझाकी योजी तसेच जपान भारत मैत्री प्रोत्साहन संस्थेचे श्री. निजीमत यांनी संयोजन केले होते.

यावेळी विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आ.गीता जैन, आ.श्वेता महाले, आ.विक्रम काळे, आ.मनीषा कायंदे, आ.रेमश पाटील, आ.ज्ञानराज चौगुले, आ संजय बनसोडे, आ.किरण सरनाईक, आ.चेतन तुपे, आ.बाबासाहेब पाटील, आ.किशोर दराडे, आ.जयंत आसगावकर, आ.संजय जगताप, आ.लहू कानडे, आ.राजहंस सिंह विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यावेळी उपस्थित होते.


सामाजिक विषयांवरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. विशेषत: हिंसाचार आणि गुन्ह्याबाबत बोलताना त्यांनी दोष सिद्धीचे प्रमाण वाढले पाहिजे याकडे लक्ष वेधले. भारतात हे प्रमाण ५० टक्के तर महाराष्ट्रात ५४ टक्के असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, ‘जपानमध्ये हे प्रमाण ९८ ते ९९ टक्के असल्याचे पाहून आम्हाला यातून शिकायला मिळाले आहे. लोकाना न्यायासाठी अतिशय जिकिरीने वाट न पाहता त्वरीत न्याय मिळण्यासाठी ही बाब अतिशय स्तुत्य आहे. या माध्यमातून न्याय संस्थेसाठी आणि लोकांसाठी ही गोष्ट एक सोनेरी पहाटेसारखी आहे. सामाजिक कार्यकर्ते, राज्यकर्ते या नात्याने आम्ही सर्व या गोष्टीसाठी सकारात्मक आहोत. विधान सभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर आणि विधान सभा उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवळ यानीही  महाराष्ट्रात प्रगत शेती, शेतमाल प्रक्रिया, पॉलिहाऊसेस उभारण्यासाठी तसेच शेतीविषयक तंत्रज्ञानसाठी पुढाकार घेतलेला आहे. तंत्रज्ञान, उद्योग, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील आहोत. आपण सगळे एकत्र येऊन एकमेकांकडून शिकण्याच्या प्रयत्नात राहू या.’यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील विधान सभा आणि विधान परिषदेच्या कामकाजाबाबत माहिती दिली. यवेळी जपान दूतावसाचे सहकार्य मोठ्याप्रमाणात झाले.

-------------