मुंबई: मूत्रपिंडांच्या आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यासंबंधीत आजारांचे वेळीच निदान करण्यासाठी लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने किडनी जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मूत्रपिंड(किडनी) विकारांवर एक संवादात्मक सत्र, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांकरिता विविध गुण प्रदर्शन कार्यक्रम आणि 'कौन बनेगा किडनी पती' ही प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेनंतर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राजीव मेहता (स्थायी विश्वस्त), डॉ. निरज उत्तमणी(मुख्य कार्यकारी अधिकारी), डॉ. हेमंत मेहता, डॉ. के. एल. उपाध्याय, डॉ. अरुण शाह, डॉ. एल. एच. सुरतकल, डॉ. वासी शेख आणि डॉ. नागेश्वर पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
चुकीची जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि जागरूकतेचा अभाव यामुळे सर्वच वयोगटातील लोकांमध्ये मूत्रपिंडाचे आजार वाढत आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि डिहायड्रेशन सारख्या आजारांमुळे मूत्रपिंडाच्या समस्या वाढतात. जर वेळीच निदान झाले नाही तर मूत्रपिंडाच्या समस्या दीर्घकालीन मूत्रपिंड रोग (CKD) आणि अगदी मूत्रपिंड निकामी होण्यास कारणीभूत ठरू शकतात. वेळोवेळी आरोग्य तपासणी, तज्ञांचा सल्ला आणि मूत्रपिंडाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि गुंतागुंत रोखण्यासाठी आवश्यक ती माहिती प्रदान करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. मूत्रपिंड विकाराचा धोका असलेल्या व्यक्तींसाठी हा उपक्रम एक वरदान ठरला असून, त्यांना भविष्यातील मूत्रपिंडाचे विकार, गुंतागुंत टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी शिक्षित करण्यात आले.
लीलावती हॉस्पिटलचे नेफ्रोलॅाजिस्ट डॉ. हेमंत मेहता सांगतात की, मूत्रपिंडाचे आजार चटकन ओळखले जात नाहीत आणि त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये ते प्रगत टप्प्यात आढळून येतात, ज्यामुळे डायलिसिस किंवा प्रत्यारोपणाची आवश्यकता भासते. नियमित तपासणीद्वारे वेळीच निदान केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते आणि मूत्रपिंडाशी संबंधित विकारांचे अचुक व्यवस्थापन करता येते. लीलावती हॉस्पिटलच्या या उपक्रमामुळे लोकांना मूत्रपिंडाच्या आरोग्याचे महत्त्व, वेळीच उपचार आणि गरजूंसाठी प्रगत उपचारांची उपलब्धता जाणून घेण्यास नक्कीच मदत होईल. या कार्यक्रमात डायलिसिसवर असलेल्या अनेकांसह मूत्रपिंड रुग्णांचा सहभाग होता. याठिकांणी उपस्थित रुग्णांनी त्यांचे अनुभव व्यक्त केले. याठिकाणी उपस्थितीांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लीलावती हॉस्पिटलचे स्थायी विश्वस्त श्री राजीव मेहता सांगतात की, जागतिक मूत्रपिंड दिन हा मूत्रपिंडाच्या आरोग्याचे महत्त्व आणि प्रतिबंधात्मक गुंतागुंत कमी करण्यासाठी नियमित चाचणीचे महत्त्व अधोरेखित करतो. 'आर युअर किडनी ओके‘ ही या वर्षीची संकल्पना असून वेळीच निदान आणि उपचार करणे किती गरजेचे आहे हे या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. बहुतेक रुग्णांमध्ये गंभीर मूत्रपिंडाच्या आजारांचे वेळीच निदान केले जात नाही. १५-२०% प्रौढांमध्ये मूत्रपिंडाच्या विकाराचे निदान होत असून त्याचे लवकर निदान झाल्यास मूत्रपिंडाचे आजारात वाढ होऊन भविष्यातील गुंतागुंत रोखता येऊ शकते. गंभीर गुंतागुंत निर्माण होईपर्यंत मूत्रपिंडांचा समस्येकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मूत्रपिंड (किडनी) हे शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत, जे रक्तातील कचरा आणि अतिरिक्त पाणी गाळून, लघवीच्या स्वरूपात बाहेर टाकतात. मात्र विविध कारणांमुळे या अवयवाच्या कार्यात अडथळा येतो व मूत्रपिंड अकार्यक्षम होते. आपले मूत्रपिंड हे किडनी सोडीयम, कॅल्शियम, मिनरल्स, पाणी, फॉस्फरस, हिमोग्लोबिनचे संतूलन राखत असते.मूत्रपिंडाच्या आरोग्याचे महत्त्व समजून घेऊन आणि त्यांचे कार्य सुरळीत राहण्यासाठी सक्रिय पावले उचलून, आपण या महत्त्वपूर्ण अवयवाचे रक्षण करू शकतो आणि निरोगी आयुष्य जगु शकतो. यानिमित्ताने आपण आपल्या मूत्रपिंडांच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देऊन त्यांची विशेष काळजी घेण्याचा निश्चय करु.
लीलावती हॉस्पिटलचे स्थायी विश्वस्त प्रशांत मेहता सांगतात की, आम्ही वैद्यकीय शिबिरे आणि शैक्षणिक स्तरावर जागरूकता कार्यक्रमांद्वारे आरोग्याचे रक्षण आणि आरोग्यात सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहोत. अधिकाधिक लोकांना वेळीच तपासणी आणि तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे हे आमचे ध्येय हे आहे.
हा जागरूकतापर उपक्रम मूत्रपिंडाच्या आरोग्याला प्राधान्य देण्यास आणि वेळीच उपचार घेण्यास प्रोत्साहित करतो. त्वरित निदान करून भविष्यातील गुंतागुंत टाळता येऊ शकते याबाबतही याठिकाणी जनजागृती करण्यात आली. अशा उपक्रमांमुळे एक निरोगी पिढी तयार करता येईल अशी प्रतिक्रिया लीलावती हॉस्पिटल मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निरज उत्तमणी यांनी व्यक्त केली.