दबाव कोणाचा ? खुलासा करा ! प्रकाश आंबेडकरांचे उज्ज्वल निकम यांना सवाल

Santosh Gaikwad May 15, 2024 09:06 PM

मुंबई, दि. 15ः 26/11 च्या आंतकवादी हल्ल्यात करकरे, साळसकर, कामटे यांच्यासह पाच पोलीस कर्मचारी शहिद झाले. पोलीस अधिकाऱ्यांवर कोणी गोळीबार केला. कोणत्या धार्मिक संघटनेला वाचविण्यासाठी नावे समोर आली नाहीत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी करत पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना लक्ष्य केले. त्यावेळी दबाव होता, आता लोकसभेचे उमेदवार असल्याने त्यावर खुलासा करावा, अशी जोरदार मागणी बुधवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, परकियांकडून देशाच्या एकतेला धोका आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुध्दा संविधान सभेतील शेवटच्या भाषणात देशात जयचंद किती निर्माण झाले आणि या भारताला स्वतंत्र अस्तित्व गमवावे लागले, त्याची उदाहरणे त्यांनी दिले आहेत. त्यानुसार निकम यांनी २६/११ मध्ये नेमकं काय घडलं ? हे लोकांना प्रामाणिकपणे सांगावे. कोणत्या धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी, कोणत्या व्यक्तीला वाचवण्यासाठी करकरे, साळसकर, कामटे आणि पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे पुरावे सादर केले नाहीत. त्याकाळी तुमच्यावर दबाव असू शकतो. आता लोकसभेचे उमेदवार म्हणून तुमच्यावर  कोणताही दबाव नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे पुरावे न देण्याच्या सूचना कोणी दिल्या होत्या हे जाहीर करावे, असे आवाहन केले. 

२६/११ च्या हल्ल्यामागील एक हल्ला आहे. ज्याने कोणी पोलीसांवर हल्ला केला, त्याला पाकिस्तान हल्ला करणार हे माहित होते. त्याचा पाकिस्तानशी संबंध असून भाजप तो का उलगडत नाही ? असा संतप्त प्रश्न आंबेडकर यांनी भाजपला विचारला. तसेच तुम्ही राष्ट्राशी प्रामाणिक नाही तर मतदारांनी  तुम्हाला का मतदान करावं? असाही सवाल त्यांनी केला. आंबेडकर यांच्यामुळे निकम यांची चांगलीच कोंडी झाली आहे. 
*****