आचारसंहिता लागू : राज्यात सर्व जिल्हयात कधी, कुठे निवडणूक , निकाल कधी ?
Santosh Gaikwad
March 16, 2024 10:08 PM
मुंबई दि. १६ - : लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात दि.१९ एप्रिल ते २० मे, २०२४ या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालय विधीमंडळ वार्ताहार संघ येथे लोकसभा निवडणूक २०२४ बाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके, उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.
चोक्कलिंगम म्हणाले की, १८ व्या लोकसभेकरिता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिनांक १९ एप्रिल ते १ जून २०२४ या कालावधित एकूण सात टप्यांमध्ये मतदान पार पडणार असून ४ जून २०२४ रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान
महाराष्ट्रामध्ये एकूण ४८ लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात विदर्भातील ५ लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक १९ एप्रिल, २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक २० मार्च, २०२४ पासून सुरु होईल.
दुसऱ्या टप्प्यात विदर्भ व मराठवाड्यातील ८ लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक २८ मार्च २०२४ पासून सुरु होईल.
तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणातील ११ लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक ७ मे २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक १२ एप्रिल २०२४ पासून सुरु होईल.
चौथ्या टप्प्यात खान्देश, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक १३ मे २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक १८ एप्रिल २०२४ पासून सुरु होईल.
पाचव्या टप्प्यात खान्देश व कोकणातील १३ लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक २० मे, २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार असून यामध्ये मुंबई व ठाण्यातील मतदारसंघांचा सुध्दा समावेश आहे. यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक २६ एप्रिल, २०२४ पासून सुरु होईल.
मतमोजणी दिनांक ४ जून,२०२४ रोजी होणार आहे.
30-अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक
महाराष्ट्र विधानसभेच्या ३०-अकोला पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून सुध्दा दुस-या टप्प्यात पोट निवडणुक घेण्यात येणार आहेत. या पोट निवडणूकीचे मतदान दि.२६ एप्रिल,२०२४ रोजी होणार असून त्यासाठीची नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दि.२८ मार्च,२०२४ रोजी पासून सुरु होईल.
आदर्श आचारसंहिता
भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असल्यामुळे संपूर्ण राज्यात आजपासून तत्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. सदर आचार संहिता लोकसभेचे नवीन सभागृह गठित होण्याबाबतची संविधानिक अधिसूचना जारी होईपर्यंत लागू राहील. त्यामुळे उपरोक्त कालावधीत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, एकत्रित निधीतून शासकीय जाहिराती प्रसिध्द करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा करणे, शासकीय सार्वजनिक/खासगी संपत्तीचे विद्रुपीकरण इत्यादीं बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरीता राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरल्यापासून त्याच्या निवडणूक खर्चाची गणना सुरु करण्यात येईल. मात्र, नामनिर्देशन भरण्यापूर्वी निवडणूक प्रचारासाठीचे साहित्य खरेदी केलेले असल्यास व त्याचा वापर नामनिर्देशनानंतर केला गेल्यास त्या खर्चाचाही समावेश निवडणूक खर्चामध्ये करता येईल. लोकसभा निवडणुकीकरीता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु. ९५ लाख इतकी ठेवण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.४० लाख इतकी आहे.
राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे या समितीकडून पेड न्यूज संदर्भातही प्राप्त होणा-या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येते.