जनतेच्या दरबारात ठरणार खरी शिवसेना कुणाची ?

Santosh Gaikwad June 03, 2024 10:41 PM


 १३ मतदार संघाच्या निकालाकडे लक्ष 

मुंबई  : लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार ४ जून रोजी घोषित होणार आहे त्यासाठी प्रशासनाकडून जययत तयारी करण्यात आली आहे. देशाचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असली तरी सुध्दा खरी शिवसेना कुणाची याचा फैसला जनतेच्या दरबारात ठरणार आहे त्यामुळे या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. 

महाराष्ट्रात ४८ मतदार संघात महायुती विरूध्द महाविकास आघाडी असा सामना रंगला. मात्र त्यापैकी राज्यातील १३ जागांवर ठाकरे गट विरूध्द शिंदे गट अशी चुरशीची लढत झाली. दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना फेाडली. शिवसेनेच्या फोडाफोडीनंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह दिले तर ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाले.   त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हे १३ मतदार संघातले शिवसैनिक आणि जनता ठरवणार आहे. जनतेच्या दरबारातच खरी शिवसेना कुणाची याचा निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाचा निकाल सर्वसामान्य जनतेला मान्य आह का ? हे सुध्दा यातून स्पष्ट  होणार आहे. 

या १३ मतदार संघाच्या निकालाकडे लक्ष 

ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो या ठिकाणी शिंदे गटाचे नरेश म्हस्के विरूध्द ठाकरे गटाचे राजन विचारे असा सामना रंगणार आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात शिंदेंचे सुपूत्र डॉ श्रीकांत शिंदे विरूध्द ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर अशी लढत झाली. उत्तर पश्चिम मुंबईत शिंदे गटाचे रविंद्र वायकर विरूध्द ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर, दक्षिण मध्य मुंबईतून शिंदे गटाचे राहुल शेवाळे विरूध्द ठाकरे गटाचे अनिल देसाई, दक्षिण मुंबईतून शिंदे गटाच्या यामिनी जाधव विरूध्द ठाकरे गटाचे अरविंद सावंत, मावळमधून शिंदे गटाचे  श्रीरंग बारणे विरूध्द ठाकरे गटाचे  संजोग वाघेरे पाटील, नाशिकमधून शिंदे गटाचे हेमंत गोडसे विरूध्द  ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, शिर्डीतून शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विरूध्द ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे,  हातकणंगले येथून शिंदे गटाचे धैर्यशील माने विरूध्द ठाकरे गटाचे सत्यजीत पाटील, छत्रपती संभाजीनगरमधून शिंदे गटाचे संदीपान भुमरे विरूध्द ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे, हिंगोलीतून शिंदे गटाचे बाबूराव कदम विरूध्द ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर, बुलडाणा शिंदे गटाचे प्रतापराव जाधव  विरूध्द ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर तर यवतमाळ वाशिम येथून शिंदे गटाचे राजश्री पाटील विरूध्द ठाकरे गटाचे संजय देशमुख अशी चुरशीची लढत झाली आहे. राज्यातील हे १३ हायहोल्टेज मतदार संघ समजले जात असून या मतदार संघाच्या निकालाकडे लक्ष वेधले आहे. शिवसेना शिंदेंची कि ठाकरेंची या मतदार संघाच्या निकालातून स्पष्टता होणार आहे. 
 --------