राज्यात ११ मतदार संघात उद्या मतदान, बारामतीकडे देशाचे लक्ष !

Santosh Gaikwad May 06, 2024 11:56 AM


मुंबई : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रचार रविवारी संपुष्टात आला. राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान होणार असून यात महायुतीकडील सात आणि महाविकास आघाडीकडील चार जागांचा समावेश आहे या टप्प्यातील बारामतीच्या लढाईकडे देशाचे लक्ष वेधले आहे


 पहिल्या दोन टप्प्यांत राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. तिसऱ्या टप्प्याच्या प्रचार तोफा रविवारी थंडावल्या. पहिल्या दोन टप्प्यांच्या तुलनेत या टप्प्यातील प्रचार अधिक आक्रमक आणि आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापूर, सोलापूर, माढा, कराड, पुणे, धाराशिव, लातूर अशा सात ठिकाणी जाहीर सभा झाल्या. यात मोदी यांनी प्रामुख्याने शरद पवार यांना लक्ष्य केल्याचे चित्र होते. पवारांवर पुण्यातील सभेत केलेली ‘भटकती आत्मा’ ही टिप्पणी गाजली. त्यावर ‘शेतकऱ्यांसाठी आत्मा अस्वस्थ असल्याचे’ प्रत्युत्तर पवारांनी दिले. 


 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेला नकली सेना म्हणून हिणवले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्या टीकेचा भर हा प्रामुख्याने भाजप आणि मोदींवर होता. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही या टप्प्यात सभा घेतल्या. कोल्हापूरची लढत छत्रपती शाहू महाराज यांच्याविरोधात नसून ही लढाई राहुल गांधी विरुद्ध मोदी असल्याचा रंग देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकणात सभा घेतली.


तिसऱ्या टप्प्यातील रायगड, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले हे सात मतदारसंघ महायुतीकडे आहेत. तर बारामती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, उस्मानाबाद आणि सातारा हे मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहेत. यापैकी बारामती, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग , माढा, रायगड या मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. सांगलीमध्ये काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे.


गुजरात आणि गोव्यातील सर्व जागांसह १२ राज्यांतील ९४ मतदारसंघांतील प्रचार रविवारी संपुष्टात आला. सुरतमध्ये भाजप उमेदवाराचा बिनविरोध विजय झाल्यामुळे ९३ जागांवर मतदान होईल. कर्नाटकातील १४, उत्तर प्रदेशात १०, मध्य प्रदेशातील ९, छत्तीसगडमध्ये ७ तर प. बंगाल व आसाममधील प्रत्येकी ४ मतदारसंघांत मंगळवारी मतदान होईल. मतदानाची तयारी पूर्ण झाली असून संवेदनशील मतदारसंघांत अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. मतदान शांततेत पार पडण्याबरोबरच उष्णतेच्या लाटेत अधिकाधिक मतदारांना बाहेर काढण्याचे आव्हान आहे.

बारामतीच्या लढतीकडे लक्ष

बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या लढतीकडे देशाचे लक्ष वेधले आहे. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला समजला जातो मात्र बालेकिल्ल्यातच शरद पवार विरूध्द अजित पवार अशी काका - पुतण्या अशी लढाई आहे.  

उद्या कुठे मतदान ?

●रायगड ●बारामती ●उस्मानाबाद ●लातूर ●सोलापूर ●माढा ●सांगली ●सातारा ●रत्नागिरी-सिंधुदुर्ग ●कोल्हापूर ●हातकणंगलेq