मोदींचा करिष्मा ओसरला, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश !
Santosh Gaikwad
June 04, 2024 10:59 PM
मुंबई : राज्यातल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारली आहे. भाजप, शिंदे आणि पवार गट या महायुतीने ४८ पैकी ४५ प्लसचा नारा दिला होता. मात्र महायुतीला अवघ्या १८ जागांवर विजय मिळवला आहे. महायुतीचा दारूण पराभव झाला आहे. तर महाविकास आघाडीने ३० जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडल्यानंतरही भाजपला यश मिळवता आलेले नाही. तसेच मोदींचा करिष्मा महाराष्ट्रात दिसून आला नाही.
राज्यात काँग्रेसने सर्वाधिक १३ जागांवर विजय मिळवला आहे. त्याखालोखाल भाजप ९ शरद पवार गट ८ शिंदे गट ७ तर अजित पवार गटाला १ जागा मिळाली आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली तर राष्ट्रवादीतून अजित पवार गट फुटला. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात जनतेने कौल दिल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपला मोठया पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
महाराष्ट्रात महायुतीत भाजपने सर्वाधिक २३ जागा लढवल्या. यापाठोपाठ शिंदे गटाने १५ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने ४ जागा लढवल्या. तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने २१ जागा, काँग्रेसने १७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने १० जागा लढवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात अनेक सभा रोड शो करूनही त्यांचा करिष्मा महाराष्ट्रात दिसून आलेला नाही. बीडमधून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा तर अमरावतीमधून नवनीत राणा यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
राज्यात काँग्रेसचे कमबॅक
मागील दोन लोकसभा निवडणुकांपासून भाजप आणि एनडीएन मुसंडी मारली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४१ जागांवर विजय मिळाला होता. यातील २३ भाजपाच्या तर १८ शिवसेनेच्या होत्या. त्याउलट राष्ट्रवादी कॉंग्रेसला ४ आणि कॉंग्रेसला फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र राजकीय चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसनं २५ जागा लढवून फक्त एकाच जागेवर विजय मिळवला होता. तर यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसनं १५ जागांवर निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीतून कॉंग्रेसनं महाराष्ट्रात जोरदार कमबॅक केलं आहे.
शरद पवार, उद्धव ठाकरेंना जनतेचा कौल
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मेाठी फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गट आणि अजित पवार गटाला देण्यात आलं होतं. उध्दव ठाकरे यांना मशाल तर शरद पवार यांना तुतारी हे नवीन चिन्हावर निवडणूक लढवावी लागली. फोडाफोडीच्या राजकारणाला डगमगून न जाता पवार आणि ठाकरे यांनी पद्धतशीरपणे निवडणूकीची आखणी केली. योग्य उमेदवार दिले त्याचा फायदा निवडणुकीत दिसला. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर उद्धव ठाकरे यांचे प्राबल्य दिसले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा आवाज घुमणार अशी चिन्हे आहेत. ठाकरे यांनी राज्यभर प्रचार करत भाजपवर टीकास्त्र सोडले. शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी असल्याचे या निकालातून स्पष्ट झालय. फोडीफोडीचे राजकारण जनतेला पटले नसल्याने भाजपला मोठया पराभवाला सामोरे जावे लागले असून पवार ठाकरेंना जनतेचा कौल मिळाला आहे.
बारामतीत अजित पवारांना धक्का
संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या बारामतीतून सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यावर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी नणंद भावजय अशी लढत झाली होती. सुप्रिया सुळे यांनी सलग चौथ्यांदा लोकसभा निवडणुक जिंकली आहे. सुप्रिया सुळे यांनी एक लाखपेक्षाा जास्त मतांनी सुनेत्र पवार यांचा पराभव केला आहे. दरम्यान, अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने लढवलेल्या चार जागांमध्ये फक्त रायगडमध्ये सुनील तटकरे हे एका जागेवर विजयी झाले आहेत.
तीन केंद्रीय मंत्र्यांचा पराभव
राज्यात भाजपला मोठा झटका बसला आहे. राज्यातील तीन केंद्रीय मंत्र्यांना दारूण पराभव झाला. यात जालना लोकसभा मतदार संघात रावसाहेब दानवे पराभूत झाले आहे, त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांचा विजय झाला तर दिंडोरी मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचाही पराभव झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी भारती पवार यांचा पराभव केला आहे तर भिवंडी लोकसभा मतदार संघात कपिल पाटील यांचा देखील पराभव झाला शरद पवार गटाचे उमेदवार बाळयामामा म्हात्रे यांनी पराभव केला.
राहुल गांधींमुळे काँग्रेसला नवसंजीवनी
राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेमुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. राहुल गांधींची प्रतिमा यातून मोठ्या प्रमाणात बदलली आणि देशभरात लोक राहुल गांधीशी जोडले गेले. याचा सकारात्मक परिणाम कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीच्या कामगिरीवर झाला. तर इंडिया आघाडीनं देशात आणि महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात एकदिलानं काम केलं. जागावाटप करताना आणि निवडणूक लढवताना एकजूट कायम राखत निवडणुकीतील मुख्य मुद्द्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं त्यामुळे महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं.
महाविकास आघाडी
काँग्रेस १३
ठाकरे गट ९
शरद पवार ८
महायुती
भाजप ९
अजित पवार १
शिंदे गट ७