मुंबई, दि. २६ः राज्य विधिमंडळाच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यां विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. फसवणूक नको, आरक्षण द्या', महायुतीचा जागर, आरक्षणाचे नवे गाजर, अशा घोषणा देत विधानभवन परिसर दणाणूण सोडला.
राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली. अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले. 'फसवणूक नको आरक्षण द्या', 'महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर', मराठा समाजाच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, फसवे सरकार, खोके सरकार, हाय.. हाय, ओबीसींना फसवणाऱ्या सरकारचे करायचं काय? मराठ्यांना फसवणाऱ्या सरकारचे करायचं काय? खाली डोकं वरती पाय. अशा पद्धतीच्या अशा घोषणा देत सरकार विरोधात तीव्र निदर्शने केली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, आमदार नितीन राऊत, अमीन पटेल, अमित देशमुख, धीरज देशमुख, जितेश अंतापुरकर, भाई जगताप, राजेश राठोड, शिवसेना (ठाकरे) विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, सुनील प्रभू, राजन साळवी, नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) अनिल देशमुख, सुनील भुसारा आणि माकपचे विनोद निकोले आदी आमदारांनी सरकारविरोधात घोषणांचे फलक घेऊन आंदोलन केले. दरम्यान, सत्ताधाऱ्यांपुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर विरोधकांची धार कमी झाल्याचे चित्र दिसून आले.
अधिवेशनात लक्षवेधी, प्रश्नोत्तरे ठेवण्याबाबत शासनाला पत्र दिले. परंतु, शासन मानायला तयार नाही. या अधिवेशन काळात सरकारच्या कारभाराच्या चिंधड्या करुन टाकू, असा हल्लोब विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. राज्य सरकार कारभारावर यावेळी जोरदार टीका केली. सर्व पाप सत्ताधाऱ्यांनी करायचे आरोप मात्र विरोधकांवर लावायचे. हे चाळे बंद करावेत, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.