महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक एकत्रीत लढणार !

Santosh Gaikwad June 15, 2024 06:16 PM


मुंबई :  
महाविकास आघाडीने  आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषद बोलताना आगामी विधानसभा निवडणूकही पूर्ण ताकदीने लढणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत  केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून स्वबळाचा नारा देण्यात येत होता, त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, संजय राऊत, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, वंदना चव्हाण उपस्थित होत्या. यावेळी बोलताना  उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी भाजपसह मोदींचा चांगलाच समाचार घेतला. महाविकास आघाडीकडून निवडणुकीत मदत करणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घटकांचे आभार मानण्यात आले.

पृथ्वीराज चव्हाण बोलताना म्हणाले की ही पत्रकार परिषद महाराष्ट्र जनतेचा आभार मानण्यासाठी आहे. लोकशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्रात जनतेने घवघवीत यश महाविकास आघाडीला मिळवून दिले. अनेक संघटनांनी छोट्या पक्षांनी वातावरण निर्मितीसाठी मदत केल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष करून नमूद केले. लोकशाही वाचवण्यासाठी जनतेने आम्हाला मत दिल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रचंड धनशक्ती विरोधात ही निवडणूक आम्ही लढवली आणि यश मिळवल्याचं त्यांनी नमूद केले. या निवडणुकीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी सुद्धा एक संदेश दिला आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुद्धा झाला. मात्र, तो यशस्वी झाला नसल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जवळपास प्रत्येक मतदारसंघांमध्ये प्रचार केल्याचा विशेष उल्लेख पृथ्वीराज चव्हाण यावेळी यांनी बोलताना केला. आज तीन पक्षांची प्राथमिक बैठक झाली. ही बैठक विधानसभेची पूर्वतयारीच्या अनुषंगानेच होती. लोकसभेसाठी आम्ही ज्या पद्धतीने लढलो त्यापेक्षा अधिक ताकदीने लोकांचे प्रश्न मांडून विधानसभेमध्ये सुद्धा बदल करू, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, आज आमची एक बैठक झाली. पुढील निवडणूक सुद्धा एकत्रित लढणार आहोत. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र जनतेचे आभार मानतो. युट्युब आणि संघटनानी सुद्धा विचार मांडले. संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी ही लढाई होती.

 शरद पवारांचा मोदींना टोला  
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, देशाच्या पंतप्रधान मोदी यांनी राज्यात 18 सभा घेतल्या. एक रोड शो सुद्धा झाला. विधानसभेला सुद्धा जेवढ्या त्यांच्या सभा होतील तेवढा आम्हाला फायदा होईल, अशा शब्दात शरद पवार यांनी पीएम मोदी यांच्या प्रचारसभांवरून टोला लगावला.