अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतक-यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक !
Santosh Gaikwad
July 17, 2023 02:06 PM
मुंबई, दि. १७ : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सकाळी विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. सभागृहाच्या पायऱ्यावर बसून विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गैरहजर होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. विधिमंडळ अधिवेशन कामकाजाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत सभात्याग केला आहे.
विरोधकांनी विधिमंडळाच्या पाय-यांवर घोषणाबाजी करत सरकारवर टीका केली. यावेळी उध्दव ठाकरे गटाचे आमदार आणि काँग्रेसचे आमदार हजर होते. ५० खोके एकदम ओके अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीण. तसच घटनाबाहय कलंकीत सरकारचा धिक्कार असो अशा आशयाचे बॅनर देखील झळकवण्यात आले होते. राष्ट्रवादी आमदारांच्या गैरहजेरीविषयी बोलताना यावेळी सचिन अहिर म्हणाले, काही लोक नक्की आंदोलनाला आले होते. पण, आज पहिलाच दिवस असल्याने सर्वांची उपस्थिती नाही आहे. काहीजण येत आहेत. संयुक्तरितीने मंगळवारी सर्वजण आलेले दिसतील. पायऱ्यांपेक्षा सभागृहात काय भूमिका घेतली जाते, हे महत्वाचं आहे. आमदारांना एक-दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करावी लागेल.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मिडीयाशी बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव आणला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार विरोधकांना बोलू दिले नाही, आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही असे सांगत आहेत. बोगस बियाणामुळे कापसाचे पीकच आले नाही, पिक वाया गेले व वर्षही वाया गेले. मागील वर्षाचा कापूस अजूनही शेतकऱ्याच्या घरात पडून आहे पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. राज्यातील तिघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे, शेतकरी व जनतेला लुटण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा सरकारने केली पण अजून मदत मिळालेली नाही. जनतेच्या प्रश्नावर सरकारने उत्तर दिले पाहिजे पण बहुमताच्या जोरावर राज्य सरकार उत्तर देण्यापासून पळ काढत आहे. जनतेने काँग्रेसवर विरोधी पक्षाची जबाबदारी सोपवली असून काँग्रेस पक्ष विरोधी पक्षाची जबाबदारी योग्यरितीने पार पाडत सरकारला जाब विचारत राहिल, सभागृहात बोलू दिले नाही तर रस्त्यावर संघर्ष करु असे पdटोले म्हणाले.
*राज्यात कॅसिनो सुरु करण्यास काँग्रेसचा विरोध*
महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावण्याचे पाप भाजपा सरकारने केले आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, बरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना राज्य सरकार गोव्याच्या धर्तीवर कॅसिनो सुरु करण्याचे पाप करत आहे. आधीच किराणा दुकानात बियर विकण्यास परवानगी दिलेली आहे, मुंबईसह राज्यात डान्स बारचा सुळसुळाट आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार कॅसिनो सुरु करून तरुण पिढीला बरबाद करण्याचे पाप करत आहे. काँग्रेस पक्षाचा राज्यात कॅसिनो सुरु करण्यास विरोध राहील.