जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकार व ‘येड्याच्या’ सरकारचा पर्दाफाश करु :- नाना पटोले

Santosh Gaikwad August 26, 2023 06:15 PM


मुंबई, दि. २६ ऑगस्ट : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ३ सप्टेंरपासून राज्यात जनसंवाद यात्रा सुरु करत आहे. गाव, खेडे, तालुका, शहर या सर्व भागातून ही यात्रा जाणार आहे. केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील येड्याचे (EDA) सरकार जनतेची लूट करत आहे, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी उद्धवस्थ झाला आहे. कृत्रिम टंचाईमुळे जनतेचे जगणे कठीण झाले आहे. भाजपा लोकशाही नाही तर सत्तेच्या स्वार्थासाठी काम करत आहे. काँग्रेस पक्ष जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकार व ‘येड्याच्या’ सरकारचा पर्दाफाश करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.


टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, ३ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या जनसंवाद यात्रेत पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उत्तर महाराष्ट्रात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, मराठवाड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पश्चिम विदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व पूर्व विदर्भात मी (नाना पटोले) यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघणार आहे. भाजपा सत्तेच्या जोरावर सर्व सरकारी यंत्रणामध्ये हस्तक्षेप करत आहे. संविधान संपुष्टात आणले जात आहे, विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करत आहे. जनतेच्या समस्यांकडे भाजपा सरकार लक्ष देत नाही म्हणून जनतेच्या व्यथा, समस्या, वेदना या यात्रेच्या माध्यमातून समजून घेतल्या जाणार आहेत.


फोन टॅपिंग प्रकरणावर बोलताना पटोले म्हणाले की, सत्तेच्या जोरावर भाजापाने ही फाईल बंद केली असली तरी भाजपा सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही, काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर ही फाईल पुन्हा खुली केली जाईल. माझ्यासह भाजपातील नेत्यांचेही फोन आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी टॅप केले होते. त्यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला होता पण कोर्टाने अधिक चौकशी करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. शिंदे-फडणवीस सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे दिले व सीबीआयने हे प्रकरण बंद केले.


यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने खरिपाचे पीक वाया गेले आहे. पिण्याची पाण्याची टंचाई व चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. लोक त्रस्त आहेत, पाण्याच्या टँकरची मागणी करत आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे दुष्काळाकडे लक्ष नाही अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासन कुठे आहे ? असा प्रश्न पडला आहे. कांद्याचे भाव पडल्याने नाफेड मार्फत २४१० रुपयांने २ लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला पण एकट्या नासिक जिल्ह्यातच १५ लाख टनांपेक्षा जास्त कांदा उत्पादन होते. कांदा खरेदी करण्यासाठी नाफेडने अत्यंत जाचक अटी घातलेल्या आहेत. कांद्याचा आकार, रंग, वास सुद्धा तपासला जाणार आहे. भाजपा सरकारकडून शेतकऱ्यांची अवहेलना सुरु आहे.


माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका मागील दिड-दोन वर्षांपासून घेतल्या जात नाहीत. राज्यातील वातावरण सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असून पराभवाच्या भितीने निवडणुका घेतल्या जात नाहीत. विविध कारणे देऊन सरकार निवडणुका टाळत आहे. सरकारकडे ओबीसी, मराठा आरक्षणासंदर्भात कोणतेही धोरण नाही. केंद्र सरकार जोपर्यंत ५० टक्क्यांची मर्यादा दूर करत नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. आरक्षण नसल्यामुळे नोकर भरती सुरु असतानाही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. सरकार केवळ बैठकांचे गाजर दाखवत आहे.


इंडिया आघाडीची बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होत आहे. या आघाडीत २६ पक्ष असून आणखी मित्र पक्ष सहभागी होऊ शकतात. ३१ तारखेला बैठकीसंदर्भात अनौपचारिक चर्चा होईल व सविस्तर बैठक १ तारखेला होईल. या बैठकीनंतर टिळक भवन येथे राहुलजी गांधी यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.   


यावेळी जनसंवाद यात्रेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, सीडब्ल्यूसी सदस्य व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, दावंनद पवार, राजेश शर्मा, आ. संग्राम थोपटे, माजी आमदार अमूर राजूरकर आदी उपस्थित होते.

---------------------