मुंबईतील ३६ विधानसभा जागांवरुन मविआत पेच !
Santosh Gaikwad
September 13, 2024 08:49 PM
मुंबई : मुंबईत जागा वाटपावरुन काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. मुंबईतील 36 विधानसभा जागांवरुन पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्याकडील जागांचे गणित पाहता काँग्रेसने आक्रमक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुंबईतील ३६ विधानसभा जागांपैकी २१ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. तर शरद पवार गट 7 जागांसाठी आग्रही आहे. या सर्व कवायतीत काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 8 जागा उरत आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे. शरद पवार गट मुंबईतील अंधेरी वेस्ट, वर्सोवा, कुर्ला, अणुशक्ति नगर, दहिसर, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या जागांची मागणी करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी २८८ पैकी १८० पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलाय. महाविकास आघाडीत राज्यातील १२५ जागांवर सहमती झाल्याचा दावा त्यांनी केला. तर इतर जागांवर चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट यांना लोकसभेप्रमाणे विधानसभेत बदल घडेल अशी आशा आहे.