राज्यात परिवर्तन करण्याची जनतेची मानसिकता; मविआ बहुमताने विधानसभा निवडणूक जिंकेल: रमेश चेन्नीथला*

Santosh Gaikwad September 06, 2024 04:40 PM


मुंबई, दि. ६ सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याचे काम सुरु असून आतापर्यंत काँग्रेस पक्षाने १७२ मतदार संघाचा आढावा घेतला आहे. २५ तारखेपर्यंत सर्व २८८ मतदार संघाचा आढावा पूर्ण होईल. राज्यातील वातावरण मविआसाठी अनुकुल आहे, परिवर्तन करण्याची जनतेची मानसिकता बनलेली असून भ्रष्ट महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचून २/३ बहुमताने मविआचे सरकार येईल असा, विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.

टिळक भवनमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना चेन्नीथला पुढे म्हणाले की, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, हत्या, दरोडे, महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली आहे. पुण्यात तीन दिवसात दोन हत्या करण्यात आल्या. महागाई आवाक्याबाहेर गेल्याने सण साजरे करणे अवघड झाले आहे. जनता प्रचंड त्रस्त आहे पण महायुती सरकार मात्र घोटाळे करून पैसे वसुल करण्यात व्यस्त आहे असे चेन्नीथला म्हणाले. 

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मराठवाडा व विदर्भात पुराने थैमान घातले असून १२ लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, १२ लोकांचा मृत्यू झाला आहे, रस्ते, पुल वाहून गेले परंतु केंद्रातील भाजपा सरकार महाराष्ट्राकडे लक्ष देत नाही. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पुर आल्यानंतर दोन केंद्रीय मंत्रालये तैनात करण्यात आली आहेत, कृषी मंत्री व अर्थमंत्री तातडीने मदत मिळावी यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप केंद्राचे पथकही आले नाही, केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न भावाची वागणूक का देत आहे? केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला अजून मदत का मिळत नाही? महायुतीचे नेते केंद्राकडे मदत का मागत नाहीत? असे सवाल पटोले यांनी विचारले आहेत.

पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात गुंतवणूक वाढली असा देवेंद्र फडणवीस यांचा दावा आहे तर मग राज्यात बेकारीचे प्रमाण प्रचंड का आहे? बेकारी कमी का होत नाही? याची उत्तरे फडणवीस यांनी द्यावीत. भाजपा व फडणवीस सातत्याने खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत, असेही पटोले म्हणाले.

या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त आदी उपस्थित होते.