ठाणे: समृध्दी महामार्गावर पुन्हा भयानक दुर्घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळील खुटाळी गावाजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना क्रेन व गर्डर कोसळून १४ कामगारांचा मृत्यू झाला असून, ३ कामगार जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री १२ वाजता ही घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्या अपघाताच्या आठवणी ताज्या असताना समृद्धी महामार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळ ही घटना घडली. समृध्दी महामार्गावर शहापूर जवळील सरलंबे गावाजवळ ब्रीजचे काम सुरू होते. या ठिकाणी एकूण १७ कामगार आणि ९ इंजिनिअर काम करत होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास पुलाचे काम सुरू असतानाच अचानक त्यावरील ग्रेडर आणि मशिन खाली कोसळली. ही क्रेन कामगारांच्या अंगावर कोसळल्याने त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला तर अनेक कामगार अडकले गेले.
जखमींना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल व शहापूर मधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफ ची टीम व अग्निशमन सह इतर टीम उपस्थित आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व महसूल प्रशासन घटनास्थळी उपस्थित आहेत. स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या क्रेन व ग्रेडर खाली किती जण दाबले गेले आहेत, हे संपूर्ण ग्रेडर बाजूला केल्यावर समजले. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.