मुंबई : विधवा महिलांना ‘गंगा भागिरथी’ बोलण्यावरुन नवा वाद निर्माण झाला असतानाच, आता राज्य सरकारने याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचा खुलासा केला आहे. राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिले.
विधवा महिलांना गंगा भागिरथी शब्द वापरण्याच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांकडून सरकारवर सडकून टीका होत आहे. विरोधी पक्षाकडूनही या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे अखेर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.
मंत्री लोढा यांनी सांगितले की, विधवा महिलांच्या नावापुढे काय शब्द वापरावे याबाबत चर्चा होती. यामध्ये गंगा भागीरथी असा शब्दही सूचवण्यात आला होता. मी सर्व नावे विभागाकडे चर्चेसाठी पाठवले. पण याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. अजून कुठलाही जीआर काढण्यात आलेला नाही. याबाबत काहीच निर्णय झाला नाही. एक पत्र आलं. ते पत्र फॉरवर्ड झालं. त्यामध्ये काय झालं? पूर्वीपण एक पत्र आलं होतं. तेही फॉरवर्ड केलं, आता हे पत्रसुद्धा फॉरवर्ड केलं”, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.
------