विधानसभेच्या २८८ जागा लढविणार : जरांगे पाटील यांची घोषणा
Santosh Gaikwad
May 31, 2024 08:37 PM
पुणे : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलेले नाही तसेच राज्य सरकारने सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी अजून केलेली नाही. या दोन्हींची अंमलबजावणी सरकारने केली नाही तर, आगामी विधानसभेत आम्ही २८८ मतदारसंघात उमेदवार उभे करु, अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे येत्या ४ जून पासून आमरण उपोषण सुरु करणार आहेत. त्याच दिवशी लोकसभेचा निकाल आहे.
मनोज जरांगे यांना २०१३ सालीच्या कोथरुड पोलिस ठाण्यांतर्गत दाखल एका फसवणुकीच्या गुन्ह्यात वॉरंट निघाले होते. या प्रकरणी आज पुणे जिल्हा कोर्टात ते हजर झाले. त्यांच्याविरोधातील वॉरंट शिवाजीनगर न्यायालयाकडून रद्द करण्यात आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विधानसभेच्या २८८ जागा लढविणार असल्याचे सांगितले.