'भारत की बात सुनाता हूँ...'अभिनेता मनोज कुमार यांचं निधन!

Santosh Sakpal April 04, 2025 09:13 PM

 मनोज कुमार यांचं अभिनेत्याचं जुनं नाव काय होतं आणि ते का बदललं?

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन झालं आहेते 87 वर्षांचे होतेमुंबईत कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मनोज कुमार यांनी 'भारत कुमार' या नावानंही ओळखलं जातं. रुपेरी पडद्यावर त्यांच्या खास अभिनय शैलीसाठी ते ओळखले जातात.

 फोटो स्रोत,X

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे मनोज कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी तयार केलेल्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी मनोज कुमार कायम स्मरणात राहतील असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

त्यांचे मूळ नाव हरिकृष्ण गोस्वामी होते. त्यांचा जन्म 1937 साली अबोटाबाद येथे झाला होता. आता हे स्थान पाकिस्तानात आहे. देशभक्तीवर मनोज कुमार यांनी अनेक सिनेमे केले, ते सर्व लोकप्रिय झाले त्यामुळे त्यांचे नाव भारत कुमार असेच झाले.

मनोज कुमार यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते लिहितात, "श्री मनोज कुमार अतिशय प्रतिभावान अभिनेता होते. त्यांनी केलेल्या देशभक्तीने ओतप्रोत सिनेमांच्या निर्मितीमुळे सदैव आठवणीत राहातील. त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती."

एएनआय वृत्तसंस्थेने चित्रपट निर्माते अशोक पंडित यांचा एक व्हीडिओ शेअर केला. त्यात पंडित म्हणतात, "दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आणि भारतीय सिनेसृष्टीतीले एक दिग्गज कलाकार मनोज कुमार आता आपल्यामध्ये राहिले नाहीत. सर्व सिनेसृष्टीसाठी हा मोठा धक्का आहे. सर्व चित्रपटउद्योग त्यांचे सतत स्मरण करत राहिल."

मनोज नाव कसं मिळालं?

काही वर्षांपूर्वी बीबीसी या वृत्तवाहिनी सोबत झालेल्या एका वार्तालापात मनोज कुमार यांनी आठवणी सांगितल्या होत्या,  त्या आम्ही  वाचकांसाठी येथे देत आहोत

या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले ''बालपणी आमच्यासाठी चित्रपट हे जणू परीकथेसारखे असायचे. मला एकदा माझ्या मामानी एक चित्रपट दाखवला होता. त्या चित्रपटात दिलीप कुमार यांचा मृत्यू होतो. त्यानंतर अंदाजे 20-25 दिवसांनी आम्ही दुसरा चित्रपट पाहिला 'शहीद'. त्यातही तसंच होतं.

त्या चित्रपटातही त्यांचा मृत्यू दाखवला गेला. हे सगळं बघून मी गोंधळून गेलो. आईने मला काय झालं असं विचारलं, तर मी तिला म्हटलं, "आई, एक माणूस किती वेळा मरू शकतो?"

आईने उत्तर दिलं – "एकदाच."

मग मी विचारलं – "जो दोन-तीन वेळा मरतो तो?"

आई म्हणाली – "तो फरिश्ता (देवदूतअसतो."

तेव्हा "मलाही फरिश्ता व्हायचंय" असं माझ्या मनात आलं.

मला चित्रपट पाहण्याची आवड निर्माण झाली होती. त्याच दरम्यान मी 'शबनम' नावाचा एक चित्रपट पाहिला. त्यातही दिलीप कुमार होते.

त्या चित्रपटात त्यांचं नाव 'मनोज' होतं, आणि मला ते नाव खूप आवडलं. त्या काळात आम्ही एका रेफ्युजी कॅम्पमध्ये राहत होतो. तिथे वेगवेगळ्या भाषेच्या लोकांचा वावर होता. तिथे 'मनोज' नावाचं कोणीच नव्हतं.

त्यामुळं मी तेव्हाच ठरवलं होतं की, अभिनेता बनल्यानंतर 'मनोज' हे नाव ठेवायचं.

भगतसिंगांप्रती आपुलकी

फाळणीनंतर मी दिल्लीला आलो आणि नंतर तिथून मुंबईला आलो. दिल्लीबद्दल फार आठवणी येत नाही, कारण तिथं जाणं शक्य आहे. पण अबोटाबाद आणि लाहोर मला सतत आठवतं, कारण तिथं मी आता जाऊ शकत नाही.

लहानपणी मन हे कोऱ्या कागदासारखं असतं. त्यावर जे लिहिलं जातं, ते कधीच पुसलं जात नाही. म्हणूनच तिथल्या आठवणी अजूनही जिवंत आहेत. तिथलं हिल स्टेशन, आर्मी हेडक्वॉर्टर, झाडं, मला अजूनही सगळं आठवतं.

 फोटो स्रोत,MANOJ KUMAR

एकदा लहानपणी आम्हाला गल्लीत एक नाटक करायचं होतं. ते भगतसिंगांवरचं नाटक होतं. माझी शरिरयष्टी व्यवस्थित असल्यामुळं मला भगतसिंगांची भूमिका देण्यात आली. पण जेव्हा प्रत्यक्ष नाटक करायचं होतं, तेव्हा मी स्टेजवर जायला घाबरलो.

सगळ्या गल्लीसमोर जाला मला भीती वाटू लागली. त्यावेळी मला हे का करता येत नाही याचं शल्य मनात आलं होतं.

त्यावेळी वडिलांनी मला चिडून, 'तू तर खोटा खोटा भगतसिंगही बनू शकला नाही' असं म्हटलं. त्यानंतर माझ्या मनात ते कायमचं राहिलं. मी कधी पेन्सिलने मिशा तयार करायचो तर कधी वडिलांना त्रास द्यायचो. पण त्यामुळं भगतसिंगांबद्दल मनात आदर वाढत गेला.

'शहीदबनण्यामागची गोष्ट

मोठा झाल्यानंतर मी भगतसिंगांबद्दल वाचायला सुरुवात केली. त्यांच्याबद्दल जिथं जे काही मिळेल, सगळं वाचत गेलो. सुमारे तीन-चार वर्षं मी फक्त माहिती मिळवण्यात घालवली. पण तेव्हा भगतसिंगांवर कुठलीच नीटशी पुस्तकं उपलब्ध नव्हती, त्यामुळं खूप वेळ लागला.

पण तरीही मी एक स्क्रिप्ट तयार केली आणि माझ्या मित्राला म्हणजे कश्यपला दाखवली. त्यानेही मग "या विषयावरच चित्रपट बनवायचा" असा हट्ट धरला.

या चित्रपटाचं संपूर्ण श्रेय मी कश्यपलाच देतो. अशा प्रकारे 'शहीद' चित्रपट तयार झाला आणि माझी मेहनत यशस्वी ठरली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

दिलीप कुमार यांचा 'शहीद' चित्रपट क्रांतिकारकांवर आधारित असला, तरी त्यात एक प्रेमकथा होती. पण माझा 'शहीद' त्या चित्रपटापेक्षा पूर्णपणे वेगळा होता, खऱ्या अर्थाने क्रांतिकारक भगतसिंगांच्या जीवनावर आधारित.

मी हरिकृष्णला 'मनोज कुमार' बनवलं. पण मनोज कुमारला 'भारत कुमार' बनवलं – आपल्याच जनतेनं.