मंत्रालयातील ६०२ नंबरच्या केबीनची अशीही कहाणी !

Santosh Gaikwad July 12, 2023 08:51 PM


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार गट शिंदे सरकारमध्ये सामील झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. सरकारमध्ये नवीन गट आल्याने त्यांना मंत्रालयातील केबीन दिली जात आहेत. मात्र नेहमीप्रमाणे यंदा मंत्रालयातील ६०२ नंबरची केबीन कोणीही घेण्यास तयार नाही. या केबीनविषयी अनेक अफवा, अंधश्रध्दा आजही दिसून येत आहेत. अनेक वर्षापासून या केबीनमध्ये बसायला एकही मंत्री तयार होत नाही. त्यामुळे मंत्रयांच्या शपथविधीनंतर पून्हा एकदा ६०२ नंबरच्या केबीनची चर्चा रंगली आहे. 


मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर ६०२ नंबरची केबीन आहे. ही केबीन शापीत असल्याची चर्चा नेहमीच होत असते. आजपर्यंत ही केबीन ज्या ज्या मंत्रयांना मिळाली त्या त्या मंत्रयाना राजकीय आयुष्यात अनेक संकटांना तोंड द्यावे लागलय. त्या मंत्रयांना आपला  कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही अशा अंधश्रध्दा पसरल्या आहेत. त्यामुळे ही केबीन कोणत्याही मंत्रयाला नको असते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुध्दा ६०२ नंबरची केबीन नाकारल्याचे समजतंय.  


सहाव्या मजल्यावर ६०१ नंबरच्या केबीनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसतात. ६०३ नंबरच्या केबीनमध्ये मुख्यमंत्रयांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्याकडे आहे. ६०४ नंबरच्या केबीनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी बसतात. ६०५ नंबरच्या केबीनमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारभार पाहतात. 


*६०२ केबीन विषयी काय आहे चर्चा ...*


६०२ केबीनमध्ये जो मंत्री बसतो त्याच्या राजकीय कसोटीचा काळ सुरू होतो अशी मंत्रालयात चर्चा आहे. २०१४ आधी या केबीनमध्ये अजित पवार बसले होते. त्यानंतर अनेकदा त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीने हुलकावणी दिली. सिचंनासह शिखर बँक घोटाळयाचे आरोप झाले. २०१९ मध्ये पहाटेची आणि २०२३ ला दुपारची शपथा त्यांनी घेतल्या. 


२०१४ मध्ये भाजप सत्तेत आल्यांनतर एकनाथ खडसेंना ६०२ नंबरची केबीन दिली होती. खडसेंकडे सातहून जास्त मंत्रीपद होती. त्यांच्या मागे आरोपांचा सिसेमिरा लागला आणि मंत्रिपदाच्या दीडच वर्षात खडसेंना राजीनामा द्यावा लागला. एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर पांडूरंग फुंडकर ६०२ केबीनमध्ये आले. खडसेंच्या कृषी खात्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली. मात्र त्यांच अकाली निधन झालं. फुंडकरांच्या निधनानंतर भाजपचे अनिल बोंडे ६०२ केबीनमध्ये आले. कृषी खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. मात्र मंत्री असूनही २०१९ च्या निवडणुकीत बोंडेंचा पराभव झाला. त्यानंतर भाजपने राज्यसभेवर घेऊन त्यांचे पूर्नवसन केले. 


*वास्तूशास्त्राचा दाखला ...*


६०२ केबीन बदनाम होण्यामागे काहीजण वास्तूशास्त्राचा दाखला देतात. घर अथवा कार्यालयाचे तोंड दक्षिण दिशेला  असणे अशूभ मानलं जातं. सहाव्या मजल्यावरील केबीनची रचना पाहिल्यास मुख्यमंत्रयांची केबीन पूर्व दिशेला, प्रधान सचिवांची केबीन पश्चिम दिशेला, उपमुख्यमंत्रयांची केबीन उत्तर दिशेला, तर ६०२ केबीन दक्षिण दिशेला आहे. त्यामुळेच जेव्हा या केबीनची चर्चा होते, तेव्हा वास्तूशास्त्राचा दाखला दिला जातो. 


सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची दालने आहेत. राज्यात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री लाभल्याने अजित पवारांसाठी केबीन करावी लागणार आहे. ६०२ नंबरच्या केबीनला अजित पवारांनी नकार दिल्याने प्रधान सचिव आणि सचिव कार्यालय हलविण्यात येणार असून ६०३ आणि ६०४ केबीन एकत्र करणार असून त्या ठिकाणी अजित पवार यांना केबीन देणार असल्याचे समजते. मात्र ६०२ नंबरच्या केबीनविषयीची अंधश्रध्दा कधी दूर होईल, या चर्चांना कधी पूर्णविराम मिळेल हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.