बीडसह अंतरवालीच्या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा: जरांगे पाटील

Santosh Gaikwad November 06, 2023 07:18 PM


 छत्रपती संभाजी नगरः मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि सरकारवर निशाणा साधलेला आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांना जोरदार प्रत्युतर दिलं. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही कधीच बीडच्या घटनेचं समर्थन केलेलं नाही. परंतु जसे तुम्ही तिथे पोलिसांच्या मागे लागले, तसे अंतरवालीतही केलं पाहिजे. बीडमध्ये पोलिसांच्या विरोधात बोलायचं आणि अंतरवालीच्या घटनेत पोलिसांच्या बाजूने बोलायचं, हे कसं चालेल. चौकशी करायची तर बीडसह अंतरवालीच्या घटनेचीही झाली पाहिजे. इथेही एसआयटी नेमा, अशी मागणी त्यांनी केली.

 

छगन भुजबळ यांनी बोलताना उपोषण सोडण्यास गेलेल्या न्यामूर्तींच्या अदबीच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना जरांगे म्हणाले, त्यांना मला सर..सर केलं नाही. त्यांनी फक्त राम राम घातला. हिंदू संस्कृतीप्रमाणे त्यांनी नमस्कार केला. ते तरी एक जीव वाचवायला तिथे आले. तुम्ही तर आमच्याकडे फिरकलेही नाहीत. सरकार दबावापोटील कुणबी प्रमाणपत्र देत आहे, या भुजबळांच्या दाव्यावर जरांगे म्हणाले की, उलट तुमच्या दबावापोटील तुम्हाला ओबीसी आरक्षण दिलं. तुम्ही आजपर्यंत आमचं खाल्लं आहे. ते आम्हाला परत मिळतंय तर तुम्हाला जमत नाही.