मराठा आरक्षण : मनोज जरांगेच्या सरकारपुढं पाच अटी !
Santosh Gaikwad
September 12, 2023 06:46 PM
जालना : येथील अंतरावाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारला एका महिन्याचा वेळ दिला आहे. त्यासाठी जरांगे यांनी सरकारपुढं पाच अटी ठेवल्या आहेत. सरकारनं एका महिन्यात निर्णय घेतला नाही तर ३१ व्या दिवशी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. हे आंदोलन सामान्य मराठ्यांनी उभं केलं आहे. आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळं कुणीही उग्र आंदोलन करु नका, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे गेल्या १५ दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. राज्य सरकारकडून जीआर काढून मराठयांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी समिती नेमण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन जरांगेनी उपोषण सोडावे असा निर्णयही घेण्यात आला आहे. सरकारने विनवणी करूनही जरांगे यांनी उपोषण सोडलेले नाही. सरकारने एक महिन्याची मुदत मागितल्यानंतर जरांगे यांनी सरकारपुढं पाच अटी ठेवल्या आहेत.
या आहेत अटी
अहवाल कसा आला तरी महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र द्यावी लागणार, महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झाले ते मागे घ्यायचे, जेवढे अधिकारी दोषी आहेत त्यांना निलंबित करण्यात यावं, उपोषण सोडायला, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सगळं मंत्रिमंडळ उपस्थित असलं पाहिजे. उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती देखील आले पाहिजेत. उदयनराजे भोसले यांना मध्यस्थी ठेवणार आहेत. दोघांच्या मध्ये सरकार आणि मराठा समाजामध्ये दोन्ही राजे असावेत, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. उदयनराजे आपल्या बाजूनं आहेत. सरकार यांच्यावतीनं आम्हाला हे सगळं लिहून टाइम बाऊंड घेऊन लिहून द्या, आणि तुम्हाला दिलेल्या एक महिना हे मान्य असल्यास सरकार कधी उपोषण सोडायला बोलवायचं हे सांगा, असं मनोज जरांगे म्हणाले.
मी शब्द दिला आहे तुम्ही कुणाचा निषेध करायचा नाही. काय करायचं ते ३१ व्या दिवशी करा, असं मनोज जरांगे म्हणाले. सरसकट गुन्हे मागं घेतल्याचं पत्र आलेलं आहे. चार दोषींना त्यांनी निलंबित केलं आहे, जे राहिलेत त्या सगळ्यांना कायमचे निलंबित करा, असं मनोज जरांगे म्हणाले. आरक्षण घेण्यासाठी अभ्यासपूर्वक बोलल्याशिवाय पर्याय नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री
मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. मी जरांगेंशी बोललो त्यांच्या शिष्टमंडळाशी बोलतो, त्याची भूमिका ऐकतो सरकार मराठा आरक्षणाच्या भूमिकेबद्दल सकारात्मक आहे त्यांची भूमिका ऐकल्यानंतर जो काही योग्य निर्णय़ आहे तो घेतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.