मुंबई: मराठा समाजाच्या आंदोलनाला मोठं यश आलं असून, मराठा समाजाच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांच्या सभास्थळी जात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन, जरांगेंच्या हाती अध्यादेश सुपूर्द केला. जरांगेंना ज्यूस पाजत उपोषण सोडलं. यावेळी मुख्यमंत्रयांनी जरांगेंची गळाभेट घेतली.
मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत. जालन्यातील आंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत लाखोंच्या संख्येने त्यांनी पायी मोर्चा काढला हेाता. मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाचा इशारा त्यांनी दिला होता. आमच्या मागण्यांवर आज रात्रीपर्यंत बाबतीत आदेश काढावा. अन्यथा, आज (27 जानेवारी) दुपारी बारानंतर आझाद मैदानाकडे कूच करू असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. त्यानंतर सरकारकडून जोरदार हालचाल सुरू झाली होती.
जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलकांचा ताफा वाशी, नवी मुंबईत या ठिकाणी थांबला होता. अध्यादेश मिळाला तरी आझाद मैदानाकडे गुलाल उधळण्यासाठी जाणार आणि नाही मिळाल्यास त्याठिकाणीच उपोषण करू असा इशाराही त्यांनी दिला होता.
मुंबईच्या वेशीवर वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मनोज जरांगे पाटील यांनी काल (26 जानेवारी) १३ मागण्या करत राज्य सरकारला आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यामध्ये अत्यंत काथ्याकूट झालेल्या सगेसोयरे हा कळीचा मुद्दा होता. या मुद्यावरून सरकारने एक माघार घेत या प्रमुख मागणीसह इतर मागण्या मान्य करत राज्य सरकारने जीआर मध्यरात्रीच काढण्यात आला.
दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठा समाजासाठी ज्याने संघर्ष केला ते संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचं मी अभिनंदन करतो. फक्त राज्याचंच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष मराठा आंदोलनाकडे लागलं होतं. आपण अतिशय संयतपणे, शिस्तीत आंदोलन केलं. कुठेही आंदोलनाला गालबोट न लावता यशस्वी केलं, त्याबद्दलही आपलं अभिनंदन करतो. आपल्या आंदोलनाचा कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली. मी सुद्धा एका शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोरगरीब समाजाचं दुख आणि वेदना याची कल्पना आहे. म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे.