१९८३ ची ती दुपार होती. मनोज कुमार यांच्या आमंत्रणावरून मी त्यांच्या जुहू येथील बंगल्यावर गेलो होतो. माझ्याप्रमाणेच इतरही पत्रकारांना त्यांनी आमंत्रित केले होते. आपले धाकटे चिरंजीव कुणाल गोस्वामी यांना मनोज कुमार लॉन्च करू इच्छित होते. कुणालचा परिचय करून देण्यासाठीच त्यांनी ती पत्रकार परिषद बोलविली होती. त्यादिवशी प्रथमच मी माझ्या आवडत्या मनोज कुमार यांना 'याची देही याची डोळा' प्रथम पाहिले. मी पहिलीत असताना मनोज कुमार यांचा उपकार हा सिनेमा पाहिला होता. तेव्हापासून मी त्यांचा चाहता बनलो होतो. त्यादिवशी पत्रकार म्हणून त्यांना भेटताना एक वेगळेच थ्रिल मी अनुभवले.
त्या पहिल्या भेटीत मला जाणवला तो मनोज कुमार यांचा मिश्किलपणा, त्यांचा मनमोकळेपणा. पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर श्याम औरंगाबादकर नावाचे एक छायाचित्रकार उशिरा आले. औरंगाबादकरांचे पोट थोडे वाढलेले होते. त्यांना उशिरा आलेले पाहून मनोज कुमार पटकन म्हणाले, "श्याम जब भी आता है लेट आता है, मगर शाम के पहले उसका पेट आता है." मनोज कुमार यांच्या विनोदावर तेथे एकच हशा उसळला.
पाहुण्यांसाठी सौ. शशी मनोज गोस्वामी यांनी विविध प्रकारच्या खमंग पदार्थांची व्यवस्था केली होती. मनोज कुमार व त्या स्वतः सर्वांना खाण्याचा आग्रह करीत होते. पण काही जण खाण्याच्या बाबतीत हात आखडता घेत होते. ते पाहून मनोज कुमार म्हणाले, "खाण्याच्या बाबतीत इतके का घाबरता? वजन वाढण्याची भीती वाटते का? तसे जर असेल तर वजन कमी करण्याचा दोन अंगठ्यांचा एक सोपा व्यायाम माझ्याकडे आहे." मनोज कुमार यांचे हे बोल ऐकताच सर्वजण त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहू लागले. मग ती उत्सुकता अधिक न ताणता मनोज कुमार धीर गंभीरपणे म्हणाले, "खाण्याची थाळी जर समोर आली तर दोन अंगठ्यांनी ती मागे सारायची. तुमचे वजन कधीच वाढणार नाही." मनोज कुमार यांच्या या विनोदावर तेथे जो हशा पिकला तो मी आज देखील विसरलेलो नाही.
मनोज कुमार, धर्मेंद्र आणि शशी कपूर हे समकालीन अभिनेते होते. पण धर्मेंद्र आणि शशी कपूर यांनी किमान 300 300 चित्रपटात भूमिका केल्या. मनोज कुमार यांनी मात्र फक्त 35 चित्रपटात आपल्या भूमिका साकारल्या. यावरून चित्रपट निवडण्याच्या बाबतीत ते किती चुसी होते हे लक्षात येते.
फिल्म इंडस्ट्री म्हणजे एक मायानगरी आहे. एकदा देवानंद यांना विचारले गेले की, "आपण आपल्या खाजगी जीवनात नायिकांशी कधीच रोमांस केला नाहीत का?" त्यावर देवानंद यांनी दिलेले उत्तर फारच मार्मिक होते. ते म्हणाले, "अशी संधी चालून आली असता जर ती कुणी सोडली तर एक तर देव असेल अथवा नपुंसक असेल. मी त्यापैकी कुणीही नाही." हा किस्सा सांगण्याचा उद्देश असा की त्या अर्थाने मनोज कुमार हे साक्षात देवच होते. आपल्या नायिकांसोबत वावरताना त्यांनी सदैव एक सुरक्षित अंतर ठेवले. त्यांच्या सर्व चित्रपटातून हे जाणवते. अपवाद ठरला तो राज कपूर यांचा मेरा नाम जोकर हा चित्रपट. या चित्रपटात त्यांनी सिमी गरेवाल यांचे चुंबन घेतले. ते देखील राज कपूर यांच्या सांगण्यावरून. आपण राज साहेबांना नाही म्हणू शकत नव्हतो म्हणूनच मला नाईलाजाने तसे करावे लागले, असा खुलासा मनोज कुमार यांनी नंतर केला. थोडक्यात सांगायचे झाले तर मनोज कुमार हे फिल्म इंडस्ट्री मधील ' मर्यादा पुरुषोत्तम भारत' होते.
मनोज कुमार हे शिर्डीच्या साईबाबांचे भक्त होते. बाबांवरील श्रद्धेपायीच त्यांनी शिर्डी के साई बाबा हा चित्रपट काढला. तो तुफान चालला. आजही त्या चित्रपटातील अनेक गीते लोकप्रिय आहेत. मनोज कुमार जातील तेथे आपल्या सोबत बाबांची तस्वीर घेऊन जात. साईबाबा हे त्यांच्या जीवनातील मोठा आधारस्तंभ होते.
१९८३ या वर्षी मी मनोज कुमार यांच्या बंगल्यावर पत्रकार परिषदेसाठी गेलो असताना तिथे त्यांचे वयोवृद्ध पिताजी देखील भेटले. मनोज कुमार यांनी त्यांची ओळख करून दिली. अत्यंत साधे आणि मितभाषी असे ते व्यक्तिमत्त्व होते. पुढे काही काळाने त्यांचे अपघात निधन झाले. वडिलांच्या अचानक जाण्याने मनोज कुमार अत्यंत दुःखी झाले. त्यांना नैराश्य आले. त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले. लोकांना भेटण्याचे ते टाळू लागले. पुढे अनेक चांगले चित्रपट देण्याची धमक मनोज कुमार यांच्यात होती. पण कदाचित नियतीलाच ते मान्य नव्हते. चंदेरी दुनियेच्या झगमगटापासून ते कायमचे दूर झाले. आता तर ते पुन्हा कधीही न येण्यासाठी दूर दूर गेले आहेत. अलविदा मनोज जी. जय हिंद.
-नरेंद्र विश्वनाथराव वाबळे
9820152936