विज्ञान आणि माध्यमांमध्ये समन्वय साधण्यासाठी रिच संस्थेद्वारे मुंबईत असंसर्गजन्य रोगांवर परिषदेचे आयोजन

Santosh Sakpal April 11, 2025 01:43 PM

असंसर्गजन्य रोगांचा वाढता धोका रोखण्यासाठी व जनजागृतीसाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची - तज्ञांचे मत

मुंबई,  :- रिच (रिसोर्स ग्रुप फॉर एज्युकेशन अँड ॲडव्होकसी फॉर कम्युनिटी हेल्थ) या संस्थेद्वारे बुधवारी मुंबईत असंसर्गजन्य रोगांच्या वाढत्या धोक्यावर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण परिषद आयोजित केली होती. या परिषदेत भारतातील आघाडीचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी, पत्रकार आणि रुग्णांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात, असंसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध, काळजी आणि धोरणात्मक जबाबदारी यांबाबत समाजात योग्य दृष्टिकोन निर्माण करण्यात माध्यमांच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला. परिषदेची सुरुवात ' रिच' च्या उपसंचालिका, अनुपमा श्रीनिवासन यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. यानंतर वैयक्तिक अनुभव, वैद्यकीय दृष्टीकोन आणि जबाबदार माध्यमांच्या कथाकथनाची भूमिका यांवर आधारित महत्त्वपूर्ण चर्चासत्रांची मालिका रंगली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुकृती चौहान यांनी केले, त्यामध्ये पॅनेल सदस्य म्हणून डॉ. वंदना धामणकर (उपमहासंचालक – वैद्यकीय उपक्रम, इंडियन कॅन्सर सोसायटी - भारतीय कर्करोग संस्था), डॉ. उषा श्रीराम - ज्येष्ठ अंतःस्राव विशेषज्ञ (एंडोक्राइनोलॉजिस्ट) आणि डीवास च्या संस्थापक, आणि डॉ. सुप्रिया अरवारी - सुप्रीम हॉस्पिटलमधील ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ सहभागी होत्या. या चर्चेत निदान आणि उपचारातील, विशेषतः महिला आणि वंचित समुदायां बाबत, प्रणालीगत त्रुटींवर प्रकाश टाकण्यात आला.

लिंगभाव-प्रतिसादी आरोग्यसेवा आराखड्यांच्या गरजेकडे लक्ष वेधत, डॉ. उषा श्रीराम यांनी अधोरेखित केले, “आरोग्याच्या परिणामांमध्ये महिला आणि लिंगभेदांवर केंद्रित संशोधनात तातडीने गुंतवणूक करण्याची गरज आहे, जेणेकरून आपण वैयक्तिकृत औषधोपचारांकडे वाटचाल करू शकू. माध्यमांनी लिंग-संवेदनशील दृष्टिकोन वापरून प्रतिबंधात्मक संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवले पाहिजेत.” किशोरवयीन मुलामुलींमध्ये लवकर जनजागृती करण्याच्या महत्त्वावर चर्चा करताना, डॉ. सुप्रिया अरवारी म्हणाल्या, “प्रौढपणी निदान होणाऱ्या सुमारे ७०% असंसर्गजन्य रोगांचे मूळ पौगंडावस्थेत लागलेल्या जीवनशैलीच्या सवयींमध्ये शोधता येते, तरीही आरोग्यविषयक वृत्तांकनात यावर क्वचितच प्रकाश टाकला जातो. किशोरवयीन आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याची तातडीची गरज आहे आणि तरुण पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी व त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी समाज माध्यमांचा (सोशल मीडियाचा) एक शक्तिशाली साधन म्हणून फायदा घेतला पाहिजे.”

वैद्यकीय तज्ज्ञ आणि माध्यमांनी एकत्र येऊन जनजागृती करण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करताना डॉ. वंदना धामणकर म्हणाल्या, "कर्करोग' हा शब्द भीती निर्माण करतो आणि अनेकदा तो मृत्यूदंडेशी जोडला जातो. इंडियन कॅन्सर सोसायटीमधील समुदायांसोबत काम करताना, आम्हाला हे जाणवले आहे की आपण आपले संदेश सोपे केले पाहिजेत आणि आशा देणारे कर्करोगमुक्त झालेले रुग्ण आणि त्यांचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपलब्ध असलेल्या माध्यमांचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे, ज्यामुळे तपासणी आणि उपचार परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकतात."

यानंतर, रेटिनोब्लास्टोमावर मात केलेल्या प्रीती फड यांच्याशी मनमोकळ्या गप्पांचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे संचालन मानसी प्रभाकरन यांनी केले. सुश्री फड यांनी आरोग्यसेवा प्रणालीत उपचार घेत असतानाचे आपले अनुभव सांगितले आणि सहानुभूतीपूर्ण, वैयक्तिक काळजी किती आवश्यक आहे, यावर त्यांनी जोर दिला. समाजात असलेली संकुचित विचारसरणी कमी करण्यासाठी आणि विश्वसनीय आरोग्य माहितीचा प्रसार करण्यासाठी माध्यमे एक प्रभावी साधन कसे ठरू शकतात, हे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः, जेव्हा माध्यमे लोकांच्या खऱ्या कथा आणि त्यांच्या आयुष्यातील घटना सांगतात, तेव्हा त्याचा अधिक सकारात्मक परिणाम होतो, असे त्या म्हणाल्या. 

मानसिक आरोग्य आणि दीर्घकालीन आजारांचा अन्योन्य संबंध स्पष्ट करणाऱ्या एका परिसंवादात, मारिवाला आरोग्य संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीती श्रीधर यांनी भारतातील मानसिक आरोग्याच्या अदृश्य अश्या साथीवर प्रकाश टाकला. मानसिक आरोग्याविषयी शिक्षण समाविष्ट करण्याच्या महत्त्वावर जोर देत त्या म्हणाल्या, “कोविडनंतर प्रत्येकजण मानसिक आरोग्यावर बोलू इच्छितो—परंतु आपण विचार करणे आवश्यक आहे की आपण याबद्दल जबाबदारीने बोलत आहोत का? मानसिक आरोग्य एकाकी नसते, ते लिंग आणि जात यांसारख्या सामाजिक घटकांनी घडलेले असते. त्यामुळे सनसनाटीपणा टाळून, व्यावसायिक ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित, सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन जपणारी कथनशैली अवलंबणे गरजेचे आहे.”

यानंतर मनीकंट्रोलचे वरिष्ठ संपादक श्री. विश्वनाथ पिल्ला यांच्यासोबत चर्चा झाली, ज्यात त्यांनी कथात्मक सत्यता आणि आरोग्यविषयक बातम्यांना मानवी चेहरा देण्याच्या महत्त्वावर जोर दिला. पत्रकारांना आरोग्य वार्तांकनाला एक सार्वजनिक सेवा म्हणून पाहण्यासाठी प्रोत्साहित करताना ते म्हणाले, “आपण माहितीचा अतिभार आणि चुकीच्या माहितीच्या युगात जगत आहोत. पत्रकारांनी पत्रकारितेच्या मूलभूत तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे: वस्तुनिष्ठता, तथ्यात्मक अचूकता आणि निष्पक्ष वार्तांकन. उपाययोजनांवर प्रकाश टाकताना नेहमी विश्वसनीय तज्ञांचा संदर्भ घ्या आणि आपल्या स्रोतांची पडताळणी करा. असंसर्गजन्य रोगांविषयी जागरूकता, सेवा उपलब्धता, परवडणारी क्षमता आणि उपचारांच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकणे आवश्यक आहे.”

संपूर्ण दिवसभर, भारतातील असंसर्गजन्य रोगांचे वाढते प्रमाण - जे देशातील ६०% पेक्षा जास्त मृत्यूंसाठी जबाबदार आहे - यासाठी एकात्मिक आणि लोकोपयोगी दृष्टिकोन आवश्यक आहे, हा संदेश दिला गेला. प्रतिबंध, समर्थन आणि जनजागृती एकाच वेळी करणे आवश्यक आहे आणि समाजात योग्य दृष्टिकोन निर्माण करण्याची मोठी ताकद माध्यमांमध्ये आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.  या कार्यक्रमाने रिच संस्थेची विविध क्षेत्रांतील लोकांशी भागीदारी वाढवण्याची आणि समानता व न्याय यावर आधारित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली.    

'REACH' बद्दल:

'REACH' ही एक अशासकीय संस्था आहे, जिचे मुख्य कार्यालय चेन्नई येथे आहे. आरोग्य क्षेत्रातील वैज्ञानिक संशोधन आणि सर्वसामान्य जनतेतील जागरूकता यांमधील अंतर कमी करण्यावर आमचा विशेष भर असतो, ज्यामुळे अत्यावश्यक आरोग्यविषयक माहिती ज्यांना खरोखर गरज आहे अशा लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य होते.