मुंबई : अनेक हिंदी सिनेमात विविध भूमिका करून नावारुपास आलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते-अभिनेते आयुष्मान खुराना यांच्याशी सोमवार, दि. १८ मार्च, २०२४ रोजी दुपारी २.३० वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात वार्तालाप आयोजित करण्यात आला आहे.
अभिनयासह गायक म्हणूनही प्रसिद्ध असलेले आयुष्मान खुराना यांना अभिनयासाठी विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यात चार फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे. फोर्बस् इंडियाच्या २०१३ आणि २०१९ च्या १०० नामवंतांच्या यादीत त्यांचा समावेश होता. तसेच टाइम्स मासिकाने २०२० मध्ये त्यांचा जगातील १०० प्रभावी व्यक्तिमत्त्वापैकी एक म्हणून गौरव केला होता.
विकी डोनर (२०१२) या चित्रपटापासून त्यांची नायक म्हणून कारकिर्द सुरू झाली. पदार्पणातच त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर दम लगा के है शा (२०१५), बरेली की बर्फी (२०१७), शुभमंगल सावधान (२०१७), बधाई हो (२०१८), ड्रीमगर्ल (२०१९) आणि बाला (२०१९) हे त्यांचे चित्रपट गाजले. त्याशिवाय रहस्यप्रधान अंधाधुन (२०१८) आणि गुन्हेगारी नाट्य असलेला आर्टिकल १५ (२०१९) हे त्यांचे चित्रपट लोकप्रिय ठरले.
अशा या बहुआयामी सिने अभिनेत्याशी वार्तालाप करणे म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे. सदर वार्तालाप कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.