म्हाडाची २०३० घरांची सोडत जाहीर

Santosh Gaikwad August 09, 2024 05:58 PM

म्हाडाची २०३०  घरांची सोडत जाहीर 

मुंबई :  म्हाडा मुंबई मंडळातर्फे २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे. ९ ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील पहाडी गोरेगाव अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील २०३०  सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे.  

 म्हाडाकडून ज्या २०३०  घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे, अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३५९, अल्प उत्पन्न गटासाठी ६२७, मध्यम उत्पन्न गटासाठी ७६८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी २७६ घरं उपलब्ध आहेत. मुंबई उपनगरातील  पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड याठिकाणी म्हाडाची घरे आहेत. म्हाडाच्या लॉटरीसाठी नेहमीप्रमाणे अत्यल्प (६ लाख), अल्प (९ लाख), मध्यम (१२ लाख), उच्च उत्पन्न गट म्हणजे १२ लाखांपेक्षा अधिक  असे उत्पन्ननिहाय गट करण्यात आले आहेत.  सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादी   दिनांक आणि वेळ - ११ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६ वाजता  प्रसिद्धी होईल तर  सोडतीचा दिनांक आणि वेळ -  १३ सप्टेंबर सकाळी ११ वाजता असेल.  

लॉटरीमधील घरांच्या किंमती किती? 

पहाडी गोरेगाव : ३२ लाख ३६ हजार २०० रुपये
अँटॉप हिल-वडाळा : ४१ लाख ५१ हजार रुपये
कोपरी पवई : १ कोटी ५७ लाख रुपये
कन्नमवार नगर-विक्रोळी : ३० लाख ते ५२ लाख रुपयां दरम्यान
शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड : ५५ लाख ९२ हजार  रुपये