मुंबई : काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.दक्षिण मुंबई मतदार संघातून उमेदवारी मिळणार नसल्याचे निश्चित झाल्यानंतर देवरा यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.देवरा यांच्या प्रवेशानंतर काँग्रेस नेत्यांकडून त्यांच्यावर टीका होत आहे.
मिलिंद देवरा यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आजचा दिवस भावनिक असल्याचं म्हणत त्यांनी खासदारकीची भावना बोलून दाखवली. राजकारणात लोकसेवा ही एकमेव विचारधारा आहे. माझावर चुकीचा आरोप होण्यापूर्वी शिंदेंनी पक्षात प्रवेश दिला. खासदार होऊन मी मुंबई व राज्याचे योग्य प्रतिनिधीत्व करू शकतो, असं देवरा म्हणाले.
“आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वपूर्ण अध्यायाचा समारोप होतोय. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ता यांचा वर्षानुवर्षे पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे," असं देवरा यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहीलं आहे.
पंतप्रधान मोदींचं कौतुक
केंद्रात आणि राज्यात आता मजबूत सरकार आहे. मोदींच्या हातात देश मजबूत आहे. तर शिंदेंच्या हात राज्यात मजबूत आहेत. मी मुख्यमंत्र्यांच्या घराचे दरवाजे हे पहिल्यांदा सर्वांसाठी उघडे असल्याचं पाहतो. मोदी आणि शिंदेंच्या नितीमुळे मागच्या १० वर्षात एकही दहशतवादी हल्ला झाला नसल्याचं देवरा यावेळी म्हणाले.