विधानसभेत वडील विरुद्ध मुलगी सामना रंगणार !
Santosh Gaikwad
September 09, 2024 07:29 PM
मंत्री आत्राम यांची कन्येचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर !
मुंबई : राज्यात काका विरुद्ध पुतण्याच्या राजकारणाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे समोर येत आहेत. अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. भाग्यश्री आत्राम यांनी विधानसभेत वडिलांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे विधानसभेत वडील विरुद्ध मुलगी असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी 'भाग्यश्री आत्राम हलगीकर' या आपल्या निर्णयावर ठाम असून लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश करणार आहे. अहेरीतील अजित पवारांच्या जन्सन्मान यात्रेच्यावेळी देखील बापाइतके लेकीवर कुणाचेच प्रेम नसते.. चूक भूल करू नका, बापासोबत रहा.. अशा शब्दात साद घातली. मात्र त्यानंतरही येणाऱ्या 12 सप्टेंबरला भाग्यश्री आत्राम या शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळातल्या या पक्ष प्रवेशाकडे आणि रणनीतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातून 12 सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरीत प्रवेश करणार आहे. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अनिल देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. मागील काही दिवसांपासून भाग्यश्री आत्राम हलगीकर शरद पवार गटात प्रवेश करणार आणि वडिल धर्मराव बाबा आत्राम विरोधात लढणार अशी चर्चा सुरू होती. त्याच अनुषंगाने भाग्यश्री यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेटही घेतल्याची चर्चा होती. तर अजित पवार गटाची जन सन्मान यात्रा अहेरीत असताना अजित पवार मंचावर उपस्थित असताना धर्मराव बाबा आत्राम यांनी माझी मुलगी माझ्या विरोधात बंडखोरी करू शकते असे जाहीररीत्या बोलून दाखवले होते.