कंत्राटी नोकर भरती हे ठाकरे, पवारांचे पाप : दरेकरांचा आरोप
Santosh Gaikwad
October 21, 2023 05:48 PM
मुंबई- कंत्राटी नोकर भरतीवरून जनसामान्यांची, बेरोजगार तरुणांची उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी दिशाभूल केली आहे. यांचे हे पाप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघडं केले असून उद्धव ठाकरे, शरद पवारांनी महाराष्ट्रातील जनतेची नाक घासून माफी मागावी, असा घणाघाती हल्लाबोल भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज मुंबई भाजपा दक्षिण जिल्ह्याच्या वतीने जिल्हा कार्यालय, गिरगांव येथे आयोजित केलेल्या जन आक्रोश आंदोलनावेळी केला.
यावेळी मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर, माजी नगरसेवक अतुल शहा व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी माफी मांगो, महाविकास आघाडीचा धिक्कार असो, असे फलक हाती घेतले होते. या फलकाची कार्यकर्त्यांनी होळीही केली.
यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, एकही मारा लेकिन जोर से मारा. देवेंद्र फडणवीस यांची ही एक पद्धत आहे. अगोदर आम्ही भुंकायला देतो आणि याचा अतिरेक होतो त्यावेळी कागद पत्रासहित सत्यता लोकांसमोर आणण्याचे काम अनेकदा भाजपा आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. लोकांच्या मनात सरकारच्या, भाजपच्या विरोधात आणि खासकरून देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर डाग लावण्याचा प्रयत्न सुरू होता. म्हणून काल देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीत निघालेले जीआर, झालेले निर्णय जनतेसमोर कागदपत्रासहित दाखवून त्यांचे पाप उघड केले. त्यामुळे महाविकास आघाडी आता तोंडावर आपटली आहे.
आदित्य ठाकरेंची 'दिशा' भरकटलेली
आदित्य ठाकरे यांची 'दिशा'च भरकटलेली आहे. दिशा सालियन प्रकरणात काय दिशा यायची ती येईल. त्यामुळे आदित्य ठाकरे भरकटलेले आहेत. त्यांना दिशा सापडणार नाही हे नक्की आहे, असा टोलाही दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांना यावेळी लगावला.