५ दशकांहून अधिक परंपरा असलेला आमदार विश्वनाथ भोईर यांचा घरगुती बाप्पा !

Santosh Gaikwad September 08, 2024 06:43 PM


कल्याण दि.8 सप्टेंबर :आपण फार पूर्वीपासून गणपती बाप्पांची सेवा करत असून त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. अजूनपर्यंत तरी आपण त्याच्याकडे काही मागितलेले नाहीये. परंतू आपल्या पदरात येणारे जे काही असेल ते गणपती बाप्पा नक्कीच देईल असा विश्वास कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे. नुकत्याच सुरू झालेल्या गणेशोत्सव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला.


आपल्या घरातील दहा दिवसीय गणेशोत्सवाला आता तब्बल 55 वर्षे झाली असून आई वडिलांकडून माझ्यासाठी तसा नवस बोलण्यात आला होता. 50 वर्षांपेक्षा अधिक वर्षांची ही आमची परंपरा आणि वारसा पुढे नेण्यासाठी आमच्या घरातील आता तिसरी - चौथी पिढी सज्ज झाली आहे. गणपती बाप्पांच्या आगमनाने वर्षभर असणारा कामाचा ताण नाहीसा होऊन मन प्रसन्न होते. 


देशाभरासह आपल्या महाराष्ट्रात हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. एकट्या मुंबईचाच विचार करता गणेशोत्सव काळात त्याठिकाणी तब्बल 90 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. याचा विचार करता महाराष्ट्राची आर्थिक बाजूही या गणेशोत्सव काळात सांभाळली जाते. तर समाजात वाईट विचारांच्या माध्यमातून होणाऱ्या घटना थांबून अशा लोकांना बाप्पाने सुबुद्धी द्यावी. आणि सर्व नागरिकांना सुख समृद्धी लाभो, बळीराजासह कामगार आणि कष्टकरी बांधव सुखी होवोत अशी बाप्पाचरणी आपली प्रार्थना असल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले. 


तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण गणपती बाप्पाकडे काय मागितले या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की श्री गणेशाची मी पूर्वीपासून आराधना करत आहे. अगोदरच गणपती बाप्पावर इतर लाखो भक्तांच्या मागण्यांचा भार असल्याने आतापर्यंत त्याच्याकडे मी काहीही मागितलेले नाही. मात्र आपला गणपती बाप्पांवर पूर्ण विश्वास असून जे काही असेल ते गणपती बाप्पा आपल्या पदरात नक्की देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर पुढच्या वेळीही आपणच आमदार असावे आणि आमदार म्हणूनच आपल्या हातून बाप्पांची सेवा व्हावी अशी बाप्पा चरणी प्रार्थना करत असल्याचेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी  सांगितले. यावेळी माजी नगरसेवक प्रभूनाथ भोईर, वैशाली भोईर, वैभव भोईर आदी कुटुंबिय उपस्थित होते.