आम्ही सामाजिक कार्य करताना जात धर्म पाळत नाहीः आ. यामिनी जाधव

Santosh Gaikwad May 05, 2024 09:12 PM


मुंबईः समाजात काम करत राहणे हेच आमचे ब्रीदवाक्य असून आम्ही सामाजिक कार्य करताना जात धर्म पाळत नाही असे प्रतिपादन शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) आमदार तसेच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार यामिनी जाधव यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या उमेदवारांच्या वार्तालाप कार्यक्रमात केले. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे होते. प्रारंभी वाबळे यांनी सौ. जाधव यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले. उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी प्रास्तविक केले.


   सौ. जाधव पुढे म्हणाल्या की, मी महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्य केले असून अर्थसंकल्पावरती साडेतीन तास भाष्य केले मला असे वाटते की साडेतीन तास महापालिकेत अर्थसंकल्पावर भाषण करणारी मी पहिलीच महिला नगरसेविका असेल. आम्ही समाजात वावरत असताना अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक भेटतात. आम्ही कधीही जातधर्म भेदभाव करत नाही. आलेल्या प्रत्येक नागरिकाला त्याचे कार्य झाले पाहिजे याच भावनेतून आम्ही काम करत असतो. स्तनपान करणाऱ्या मातेसाठी  मी सार्वजनिक ठिकाणी माता बालक संगोपन केंद्राचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव पास झाला असून अनेक ठिकाणी स्तनपान केंद्र स्थापन झाले आहेत. त्याला हिरकणी कक्ष म्हणून महाराष्ट्र शासनाने नाव दिले याचा मला फार अभिमान वाटतो. तसेच गरोदर असणाऱ्या महिला पोलिसांसाठी देखील त्यांच्या कार्यामध्ये त्यांना थोडीशी सूट मिळावी म्हणून त्यांना साडी घालण्याचा देखील जीआर हा माझ्यामुळे निघाला. त्यामुळे एखादी गरोदर महिला पोलीस आपल्या कर्तव्यावर गरोदर असून देखील आपले कार्य चोखपणे पार पाडू शकते. मला असं वाटतं की ही माझ्यासाठी फार जमेची बाजू आहे. विरोधक हे नेहमीच आमच्या  कार्याला विरोध करत असतात परंतु आम्ही विरोधकांना आपल्या कामातून चोख उत्तर देत आलो आहोत. दक्षिण मुंबईत सध्या जुन्या इमारतींचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. ज्याला आपण क्लस्टर म्हणतो हे क्लस्टर डेव्हलपमेंट माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना लागू केली. त्यामुळे दक्षिण मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींना आणि भाडेकरूनाना एक मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला दक्षिण मुंबईची खासदारकीची उमेदवारी देऊन माझ्या फार  मोठी जबाबदारी दिलेली आहे. ही जबाबदारी मी आपल्या सोबतच आपल्या सहकार्याने नक्कीच पार पाडेन आणि आपल्याला असा अभिमान वाटेल असे कार्य या दक्षिण मुंबईत मी खासदार म्हणून  करेन याबाबत तुम्हाला मी ग्वाही देते.  कार्यवाह विष्णू सोनावणे यांनी आभार मानले.