उद्धव ठाकरेंच्या सभेत मनसैनिकांचा राडा : बांगड्या आणि टोमॅटो फेकत धूडगुस घातला

Santosh Gaikwad August 10, 2024 11:28 PM


ठाणे : शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेत मनसैनिकांनी राडा केल्याचा प्रकार घडला आहे.  मनसे कार्यकर्त्यांकडून सभास्थळी गोंधळ करण्यात आला आहे. बांगड्या आणि टोमॅटो फेकत कार्यकर्त्यांनी सभास्थळी धूडगुस घातला आहे. सकाळीच मराठवाड्याचा दौरा आटोपत असताना थेट शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता. माझ्या नादी लागू नका नाहीतर, माझी पोर काय करतील कळणार नाही असे राज ठाकरेंनी ठणकावले होते त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मात्र मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे.

 मनसे प्रमुख राज ठाकरेंचा ताफा अडवून त्यांच्यावर सुपारी टाकल्याच्या घटनेला आता मनसैनिकांनी जशास तसं उत्तर दिलं असून उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर आता मनसेच्या सैनिकांनी शेण टाकलं आहे. त्यानंतर मनसैनिक आक्रमक होत थेट उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम सुरू असलेल्या ठाण्यातील रंगायतनमध्ये घुसले. त्यामुळे या ठिकाणी आता मोठा गोंधळ झाला आहे. मनसेचे ५० ते ६० कार्यकर्ते या ठिकाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. त्यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. मनसेचे कार्यकर्ते ठाण्यातील रंगायतनमध्ये घुसले आणि त्यांनी शिवसेनेचा बॅनरही फाडला. या प्रकारानंतर शिवसैनिकही त्याठिकाणी जमा झाले आणि गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

------