मोदी सरकारचा निर्णय : सरकारी कर्मचाऱ्यांना RSS च्या कार्यक्रमांमध्ये जाण्यावर बंदी उठवली !

Santosh Gaikwad July 22, 2024 06:17 PM



मुंबई : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून सरकारी कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS च्या कार्यक्रमांमध्ये जाण्यावर घालण्यात आलेली बंदी उठवली आहे. १९६६ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी यासंदर्भात निर्णय घेतला होता. ५८ वर्षांपूर्वीची ही बंदी आता उठवण्यात आली आहे.


केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी निर्बंध घालण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या यादीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत.

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वागत केले आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी तत्कालीन सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांना संघासारख्या रचनात्मक संघटनाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास बंदी घालण्यात आली. सरकारचा आजचा निर्णय भारतातील लोकशाही व्यवस्थेवर शिक्कामोर्तब करणारा आहे, असे आरएसएसचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी म्हटले आहे. 

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा काँग्रेसने विरोध केला आहे. रविवारी जारी करण्यात आलेल्या या निर्णयावर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे.
------