फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेंना ३ टक्के अधिक पसंती : शिंदेसेनेच्या जाहीरातीवरून विरोधक आक्रमक !
Santosh Gaikwad
June 13, 2023 12:06 PM
मुंबई : राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा मथळ्याखाली शिंदेसेनेकडून राज्यातील विविध दैनिकांमध्ये जाहीरात करण्यात आली आहे. एका सर्व्हेनुसार मुख्यमंत्री शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती देण्यात आली. तर त्याच्या खालोखाल देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आले. शिंदेंना महाराष्ट्रात २६.१ टक्के तर फडणवीस यांना २३.२ टक्के पसंती देण्यात आली. त्यामुळे फडणवीसांपेक्षा शिंदेंना अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे. या जाहीरातीवरून विरोधक आक्रमक झाल्याने राजकारण चांगलेच तापले आहे.
राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येऊन एक वर्षही पूर्ण झालेला नाही मात्र वर्षभराच्या आतच शिवसेना भाजपमध्ये खडाखडी सुरू झाली आहे. कल्याणात शिवसेना व भाजपमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघावर भाजप नेत्यांनी दावा केला आहे. त्यानंतर शिवसेनेच्या ४ मंत्रयांच्या कारभारावरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सगळया पार्श्वभूमीवर भाजप शिवसेनेत अंतर्गत धुसफूस वाढत आहे.
'देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र' अशी जाहिरात राज्याच्या राजकारणात नेहमीच पाहायला मिळली आहे. मात्र अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वृत्तपत्रात छापून आलेल्या राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' या जाहिरातीने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. या जाहीरातीत शिंदेंपेक्षा जवळपास तीन टक्क्यांनी फडणवीसांना कमी मतं असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राज्यात फडणवीसांपेक्षा शिंदे अव्वल ठरले आहेत असे या जाहीरातीतून स्पष्ट होत आहे.
राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' या जाहीरातवरून विरोधकांकडून याचा जोरदार समाचार घेतला जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे थोडे दिवस राहतील. तर फडणवीस आणि शिंदे यांना दोघांना मिळून ४९ टक्के पाठींबा मिळत असेल तर ५१ टक्के विरोध असल्याचे या सर्व्हेमधून दिसून येत आहे. तर यापूर्वी असे सर्व्हे कोणेही वृत्तपत्रातून छापले नाहीत. मात्र आता असे सर्व्हे छापून पैश्यांची उधळपट्टी केली जात आहे. मात्र हा पैसा कोठून येत आहे असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.
कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, 'गुण नाही पण वाण लागला, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला' अशी म्हणण्याची वेळ आहे. सकाळ दैनिकाने केलेल्या सर्व्हेत शिंदे सेनेला केवळ पाच टक्के पसंती मिळतील असे म्हटले होते. त्यामुळे पुन्हा एकदा खोटे सर्व्हे करून जाहीरात बाजी करण्याचे काम शिंदे करत आहेत. परंतू २०२४ नंतर एक होते शिंदे असे म्हणण्याची वेळ येईल, अशी टीका लोंढे यांनी केली.
शिंदे गटाचे नेते स्वतःला प्रमोट करण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे शिंदे फडणवीस यांच्यात वाद सुरू आहे. त्या वादाला मागे टाकण्याचे काम म्हणून त्यामुळे हे प्रमोशन सुरू आहे. अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केले.