मुंबईत मोदींचा रोड शो, भाजपचे मोठं शक्तीप्रदर्शन !

Santosh Gaikwad May 15, 2024 09:07 PM

मुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. कल्याण, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, दिंडोरी या मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. प्रचारसाठी अवघा काही दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणात जाहीर सभा झाली तर मुंबईत रोड शो पार पडला. मोदींच्या रोड शोच्या माध्यमातून भाजपचे मोठं शक्तीप्रदर्शन केले. 


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज घाटकोरपमध्ये मोठा रोड शो आयोजित करण्यात आला. अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रीज असा रोड शो काढण्यात आला. या रोड शोला हजारो नागरिकांनी गर्दी  केली होती. या रोड शोमध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.  मोदींनी सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केलं. यानंतर त्यांच्या रोड शोला सुरुवात झाली. या रोड शोमध्ये मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते सहभागी होते. या रोड शोच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या माध्यमातून मोदींचं स्वागत करण्यात आलं.  

 येत्या २० मे ला राज्यात शेवटचं पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या शेवटच्या टप्प्यात एकूण १३ जागांवर मतदान होणार आहे. यापैकी सहा मतदारसंघ हे मुंबईतील आहेत. मोदींनी त्यांच्या आजच्या दौऱ्यातून या सर्व जागांचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. मोदींची आज नाशिकमध्ये सभा पार पडली. त्यानंतर कल्याणमध्ये सभा पार पडली. यानंतर मुंबईत मोदी यांचा पहिलाच  रोड शो पार पडला.